
फोटो सौजन्य - Social Media
नोकरीपेशा व्यक्तींसाठी निवृत्तीनंतर घरात मोकळा वेळ घालवणे काही काळानंतर कंटाळवाणे ठरते. अनेकांना पुन्हा सक्रिय कामात सहभागी व्हावेसे वाटते. अशाच निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भारतीय बीमा संस्थान (Insurance Institute of India – III) एक चांगली संधी घेऊन आले आहे. संस्थेने निवृत्त अधिकाऱ्यांसह पात्र उमेदवारांसाठी फॅकल्टी पदांच्या भरतीची घोषणा केली असून, यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय बीमा संस्थानाने कोलकाता येथील कार्यालयासाठी जनरल इन्शुरन्स फॅकल्टी, तर मुंबई कार्यालयासाठी असिस्टंट प्रोफेसर (फॅकल्टी) पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत संस्थेने १४ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत संकेतस्थळ www.insuranceinstituteofindia.com वर जाहिरात क्रमांक Advt./Faculty-G/2026/02 प्रसिद्ध केली आहे. ही भरती विशेषतः विमा क्षेत्रातील अनुभवी आणि निवृत्त अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
जनरल इन्शुरन्स फॅकल्टी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) किंवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमध्ये उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले असावेत. उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक असून, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांची असोसिएट किंवा फेलोशिप किंवा समतुल्य पात्रता असणे बंधनकारक आहे. तसेच जनरल इन्शुरन्स कंपनीत किमान १५ वर्षांचा व्यवस्थापकीय स्तरावरील अनुभव अपेक्षित आहे. या पदासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय ५५ ते ६२ वर्षांच्या दरम्यान असावे. ही नियुक्ती कराराधारित (Contractual) स्वरूपाची असेल.
मुंबईसाठी जाहीर करण्यात आलेले असिस्टंट प्रोफेसर पद हे कायमस्वरूपी (Permanent) स्वरूपाचे आहे. या पदासाठी संबंधित विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. यासोबतच बिझनेस मॅनेजमेंट किंवा सोशल सायन्स क्षेत्रात पीएचडी पदवी आणि चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असणे गरजेचे आहे. उमेदवाराने यूजीसीद्वारे घेण्यात येणारी NET किंवा SET परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच जनरल इन्शुरन्स कंपनीत व्यवस्थापन स्तरावरील किंवा अध्यापनाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. या पदासाठी ३५ ते ५५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. निवृत्ती वय ६० वर्षे राहील आणि वेतन यूजीसीच्या नियमांनुसार दिले जाईल.
या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या Application Form – Annexure मधून अर्ज डाउनलोड करून तो काळजीपूर्वक भरावा. आवश्यक कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती अर्जासोबत जोडून दिलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवाव्या लागतील. तसेच भरलेला अर्ज ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी recruitment@iii.org.in या ई-मेल पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे. विमा क्षेत्रातील अनुभवी, निवृत्त किंवा पात्र उमेदवारांसाठी ही भरती पुन्हा एकदा व्यावसायिक सक्रियतेची संधी देणारी ठरणार आहे.