फोटो सौजन्य - Social Media
UPSC परीक्षेच्या तयारीत असलेल्या प्रत्येकासाठी IPS अधिकारी श्रुती अग्रवाल हे नाव एक मोठे प्रेरणास्थान आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात जन्मलेल्या श्रुती लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होत्या. त्यांच्या बुद्धिमत्तेची झलक त्यांच्या बालपणातच दिसली होती. आपल्या मुलीला उत्तम शिक्षणाची संधी मिळावी यासाठी श्रुतीच्या पालकांनी मोठा निर्णय घेतला आणि गिरिडीह सोडून बोकारो या मोठ्या शहरात स्थलांतर केले.
श्रुतीने २०१५ मध्ये चिन्मया विद्यालयातून १२वीची परीक्षा दिली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर झारखंड बोर्डाच्या टॉपर यादीत आपले नाव नोंदवले. यानंतर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्ली गाठली. त्यांच्या उत्कृष्ट गुणांच्या जोरावर त्यांना दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रसिद्ध मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. येथे त्यांनी फक्त शिक्षणातच नव्हे तर अभिनय आणि नृत्य यासारख्या अतिरिक्त कौशल्यांमध्येही आपली चमक दाखवली. श्रुती नेहमीच अभ्यासासोबत सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहिल्या, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विशेष आत्मविश्वास विकसित झाला.
UPSC च्या प्रवासात श्रुतीला पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. अपयशाने खचून न जाता त्यांनी अधिक जोमाने तयारी सुरू ठेवली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात, म्हणजेच 2022 मध्ये, श्रुतीने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यांनी EWS (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गातून परीक्षा दिली आणि 506 वी रँक मिळवली. त्यांचे हे यश त्यांच्या कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्याचे प्रतीक आहे.
IPS अधिकारी म्हणून LBSNAA (Lal Bahadur Shastri National Academy of Administration) येथे प्रशिक्षण घेताना देखील श्रुतीने आपले अभिनय आणि नृत्य कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी केवळ अधिकारी म्हणूनच नव्हे तर एक सर्वांगीण व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. श्रुती अग्रवाल यांची संघर्षगाथा प्रत्येक UPSC स्पर्धकाला अपयशावर मात करून यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देते. UPSC ची तयारी करू पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने श्रुतीच्या या संघर्षविषयी आणखीन वाचून तिच्याकडून प्रेरणा घ्यावी.