फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NABFID) ने विश्लेषक ग्रेड (अधिकारी संवर्ग) पदांसाठी नियमित भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. पायाभूत सुविधा वित्तपुरवठ्यात आघाडीची भूमिका बजावणाऱ्या NABFID मध्ये तेजस्वी, गतिमान आणि प्रेरित व्यावसायिकांना त्यांच्या संघात सामील होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. संस्था RBI द्वारा नियमन केलेली असून, देशातील एक प्रतिष्ठित ऑल इंडिया वित्तीय संस्था म्हणून NABFID ची ओळख आहे.
इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २६ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. अर्ज सादर करण्याची व अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख १९ मे २०२५ आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३२ वर्षे असावे. उमेदवारांचा जन्म ०१ एप्रिल १९९३ ते ३१ मार्च २००४ या कालावधीत झालेला असावा. तसेच, काही प्रवर्गांसाठी वयोगटात सवलतीही उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) उमेदवारांना ५ वर्षांची, इतर मागासवर्गीय (OBC – नॉन क्रीमी लेयर) उमेदवारांना ३ वर्षांची, तर दिव्यांग (PwBD) उमेदवारांना प्रवर्गानुसार १० ते १५ वर्षांपर्यंतची सवलत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होईल, प्रथम ऑनलाईन लेखी परीक्षा, त्यानंतर व्यक्तिगत मुलाखत घेतली जाईल. गरज भासल्यास NABFID सायकोमेट्रिक चाचणी किंवा समूहचर्चा (Group Discussion) देखील आयोजित करू शकते. अंतिम निवडीत लेखी परीक्षेला ७०% गुण आणि मुलाखतीला ३०% गुण दिले जाईल. परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा करण्यात येणार आहे. पात्रतेसाठी उमेदवारांना प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे किमान ४०% गुण (SC/ST/OBC/PwBD साठी ३५%) आणि एकूण ५०% गुण (SC/ST/OBC/PwBD साठी ४५%) मिळवणे बंधनकारक आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यासावर भर द्यावा.
उमेदवारांनी NABFID च्या अधिकृत वेबसाईटला https://nabfid.org/careers भेट द्यावी. त्यानंतर “Apply Online” या लिंकवर क्लिक करून प्राथमिक नोंदणी करावी. नंतर सविस्तर अर्ज भरून आवश्यक माहिती, छायाचित्र, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणा अपलोड करावी. अर्ज शुल्क ऑनलाईन भरल्यानंतर अर्ज अंतिम सबमिट करून त्याची एक प्रत भविष्यासाठी सुरक्षित ठेवावी. NABFID मध्ये नोकरी ही केवळ नोकरी नसून, एक उत्तम करिअर घडवण्याची नामी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ही संधी साधून देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासात आपले योगदान देण्यासाठी सज्ज व्हावे.