फोटो सौजन्य - Social Media
संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला असून, यंदाही मुलींनी यशाचे वर्चस्व राखले आहे. या परीक्षेत प्रथम क्रमांकावर शक्ती दुबे आणि दुसऱ्या स्थानावर हर्षिता गोयल आहेत. मात्र सर्वाधिक चर्चेत आले आहे 61वा क्रमांक मिळवणारी आस्था सिंह. विशेष म्हणजे, आस्थाने केवळ 21 व्या वर्षी ही परीक्षा यशस्वीरीत्या पास केली असून ती देशातील सर्वात तरुण IAS अधिकाऱ्यांपैकी एक बनली आहे.
आस्था सिंह मूळची उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील कुशहां कनौरा गावातील असून, सध्या तिचे कुटुंब पंजाबमधील पंचकुला येथे स्थायिक आहे. तिचे वडील ब्रजेश सिंह हे एका फार्मा कंपनीत क्वालिटी हेड म्हणून कार्यरत आहेत, तर आई शालिनी सिंह या पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आस्थाचे शैक्षणिक जीवनही तितकेच प्रभावी आहे. तिने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ती सिव्हिल सेवेच्या परीक्षेच्या तयारीला लागली. केवळ UPSC नव्हे तर हरियाणा पीसीएस परीक्षाही तिने दिली आणि ती उत्तीर्णही झाली. सध्या ती हरियाणा सरकारमध्ये अॅडिशनल एक्साइज अॅण्ड टेक्सेशन ऑफिसर पदावर कार्यरत आहे. मात्र तिच्या UPSC मधील यशामध्ये एक खास गोष्ट म्हणजे तिने कोणतीही कोचिंग न घेता ही परीक्षा पास केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आस्थाने संपूर्ण तयारी सेल्फ स्टडीच्या माध्यमातून केली. तिने वेळेचे योग्य नियोजन, इंटरनेटचा योग्य वापर, दर्जेदार पुस्तके आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकांवर आधारित अभ्यास केला. तिच्या परिश्रमाचे फळ म्हणून तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC सारख्या कठीण परीक्षेत 61वा क्रमांक मिळवला. आस्था सिंहचे हे यश लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कमी वयात, कोणतीही कोचिंग न घेता केवळ चिकाटी, सातत्य आणि अभ्यासाच्या जोरावर मोठं यश मिळवता येऊ शकतं, हे तीने सिद्ध करून दाखवले आहे.