
फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली NCR मध्ये दिवाळीनंतर हवेतील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलं आहे. या वाढत्या धुक्यामुळे सरकारने क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत काही रासायनिक घटकांचा वापर केला जातो, त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की ‘या पावसाच्या वेळी बाहेर जाणं सुरक्षित आहे का?’
क्लाउड सीडिंग म्हणजे काय?
क्लाउड सीडिंग ही एक वैज्ञानिक हवामान नियंत्रण पद्धत आहे. या तंत्राने कृत्रिमरीत्या पावसाचे वातावरण तयार केले जाते. विशेषतः सिल्वर आयोडाइड (Silver Iodide) या रसायनाचा वापर केला जातो. हे रसायन ढगांमध्ये फवारले जाते, ज्यामुळे पाण्याचे सूक्ष्म थेंब एकत्र येतात आणि शेवटी पाऊस पडतो. ही पद्धत जगभरात अनेक दशकांपासून वापरात आहे, विशेषतः कोरड्या भागात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी.
सिल्वर आयोडाइड म्हणजे काय?
सिल्वर आयोडाइड हे चांदी आणि आयोडीन या घटकांचं मिश्रण आहे. याचा वापर केवळ क्लाउड सीडिंगसाठीच नव्हे, तर कृषी कीटकनाशके, औषधे (अँटीसेप्टिक), फोटोग्राफी, आणि काही प्रकारच्या काच निर्मितीत सुद्धा होतो. हे पाण्यात फार कमी प्रमाणात विरघळतं आणि चांदीपेक्षा थोडं विषारी असलं तरी वापरात येणारी मात्रा अत्यंत कमी असते.
आरोग्यावर परिणाम होतो का?
IIT कानपूरचे संचालक आणि क्लाउड सीडिंग तज्ज्ञ महेंद्र अग्रवाल यांच्या मते, या प्रक्रियेमुळे मानवांवर कोणताही अपाय होत नाही. त्यांच्या मते, क्लाउड सीडिंगसाठी सिल्वर आयोडाइडची मात्रा इतकी कमी असते की ती माती, हवा किंवा शरीरावर कोणताही विषारी परिणाम करत नाही. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या वेळी घरातून बाहेर पडणं पूर्णपणे सुरक्षित आहे.
कृत्रिम पाऊस म्हणजे हवामानातील प्रदूषण कमी करण्याचा आणि पाण्याची कमतरता दूर करण्याचा आधुनिक उपाय आहे. यात वापरले जाणारे रसायन अत्यल्प प्रमाणात असतात, त्यामुळे त्वचा, आरोग्य किंवा पर्यावरणावर याचा कोणताही गंभीर परिणाम होत नाही. थोडक्यात, क्लाउड सीडिंगद्वारे पडणाऱ्या पावसात भिजणं धोकादायक नाही, उलट तो हवा स्वच्छ करण्यास मदत करतो.