
फोटो सौजन्य - Social Media
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘पीएम-सेतू’ (PM-SETU) योजनेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आधुनिक ‘स्किल डेव्हलपमेंट हब’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांतील आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे.
मंत्री लोढा यांनी सांगितले की, ज्या भागात उद्योगांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी सेवा क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजीविकाभिमुख कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक युवक-युवतींना रोजगारासाठी स्थलांतर न करता आपल्या भागातच कौशल्याधारित संधी उपलब्ध होतील. कुशल मनुष्यबळाची मागणी आणि उपलब्धता यातील तफावत भरून काढण्यासाठी ‘पीएम-सेतू’ योजना महत्त्वाची ठरणार असून, उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत आयटीआयचे ‘हब अँड स्पोक’ मॉडेल विकसित केले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या प्रकल्पासाठी एकूण 242 कोटी रुपयांचा खर्च करणार आहेत. यामुळे राज्यातील आयटीआयचे शैक्षणिक, तांत्रिक आणि भौतिक स्वरूप आमूलाग्र बदलणार आहे. नागपूर येथे असलेले शासकीय आयटीआय (Government ITI Nagpur) हे हब म्हणून विकसित केले जाणार असून, मुलींचे आयटीआय नागपूर, कामठी, हिंगणा आणि बुटीबोरी येथील आयटीआय स्पोक म्हणून कार्य करतील.
छत्रपती संभाजीनगर येथील आयटीआय हब म्हणून विकसित करण्यात येणार असून, पैठण, खुलताबाद, गंगापूर आणि फुलंब्री येथील आयटीआयचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील औंध येथील आयटीआय हब म्हणून विकसित करण्यात येणार असून, औंध येथील मुलींचे आयटीआय, खेड-राजगुरूनगर आणि मुळशी येथील आयटीआयचा या योजनेत समावेश असेल. ‘पीएम-सेतू’ योजनेमुळे आयटीआय शिक्षण अधिक आधुनिक, उद्योगाभिमुख आणि रोजगारक्षम होणार असून, राज्यातील युवकांना स्वयंरोजगार, खासगी क्षेत्र आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.