फोटो सौजन्य- सोशल मीडिया
KVIC Recruitment 2026: खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), केंद्रीय कार्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मोहिमेद्वारे ‘यंग प्रोफेशनल्स’, ‘सल्लागार’ आणि ‘ज्येष्ठ सल्लागार’ या पदांच्या एकूण ५० जागा भरण्यात येणार आहेत.
यंग प्रोफेशनल्स (२० जागा): लेखा/ऑडिट, एचआर आणि प्रशासन, खादी, कायदा, विपणन, डिझाईन आणि ड्रॅगिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि प्रसिद्धी या विभागांतर्गत ही पदे भरली जातील. यासाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक असून उमेदवाराचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी २७ वर्षांपेक्षा कमी असावे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५,००० ते ३०,००० रुपये वेतन आणि प्रवास भत्ता दिला जाईल.
सल्लागार (१५ जागा): केवळ सरकारी विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले, किमान १५ वर्षांचा अनुभव असलेले अधिकारी यासाठी पात्र आहेत. उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
ज्येष्ठ सल्लागार (१५ जागा): लेखा, खादी कच्चा माल, प्रशासन, कायदा, विपणन आणि तंत्रज्ञान या विभागांसाठी ही पदे आहेत. यासाठी संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचा अनुभव व पदव्युत्तर पदवी आवश्यक असून उमेदवाराचे वय ३९ वर्षांपेक्षा कमी असावे. ज्येष्ठ सल्लागारांना दरमहा ३०,००० ते ४०,००० रुपये वेतन मिळेल.
सदर पदे पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून, सुरुवातीला १ वर्षासाठी करार केला जाईल, जो कामगिरीच्या आधारावर पुढे वाढविला जाऊ शकतो. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून, यासाठी उमेदवारांनी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकृत www.kvic.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतील सर्व अटी व पात्रता काळजीपूर्वक वाचून घ्यावी.






