फोटो सौजन्य सोशल मीडिया
अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) या संस्थेने शुक्रवारी देशभरातील विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली होती. हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांमधील दूरसंचार यंत्रणेत बिघाड झाल्याने रडार आणि संवाद व्यवस्थेतील माहिती विसंगत मिळत होती.
त्यामुळे विमानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. ही बंदी सुमारे साडेचार तासांनंतर रात्री ८.१५ वाजता उठवण्यात आली. त्यावेळी हजारो विमाने हवेत होती. त्यांना सुरक्षितपणे नियोजित विमानतळांवर उतरवण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.
Russia -Ukraine War : हीच का युद्धाची किंमत; ४.५ लाख रशियन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा
या तांत्रिक बिघाडाचा परिणाम अमेरिकेतील प्रमुख विमानतळांवर दिसून आला. शुक्रवारी हजारो उड्डाणे रद्द झाली, तर अनेक विमानांना विलंबाचा सामना करावा लागला. शनिवारीही तीन हजारांहून अधिक उड्डाणे रद्द झाल्याची नोंद झाली. शिकागो, अटलांटा, डॅलस, न्यूयॉर्क, डेन्व्हर आणि लॉस एंजेलिस येथील विमानतळांवर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. अनेक प्रवासी तासन्तास विमानतळांवर अडकून पडले. काही प्रवाशांना पर्यायी विमानांची तिकिटे मिळवण्यासाठी धावपळ करावी लागली, तर काहींनी प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेच्या प्रशासनाने या संकटामागे जुनी हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा आणि तिचे आधुनिकीकरण करताना निर्माण झालेला तांत्रिक ताण असल्याचे सांगितले. नवीन उपकरणे जोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान जुन्या यंत्रणेवर अतिरिक्त भार पडल्याने संवाद आणि रडार प्रणालीमध्ये अडचणी निर्माण झाल्या. या घटनेमागे सायबर हल्ला असल्याचे कोणतेही ठोस संकेत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, तपास सुरू आहे.
दरम्यान, विमानसेवा सुरू झाली असली तरी विमानांचे पुनर्नियोजन, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता तसेच वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून उड्डाणाची स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






