
फोटो सौजन्य - Social Media
नीता परब, मुंबई , नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मे २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए-एमएमएस ) या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संधीचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमबीए-एमएमएसच्या दुसऱ्या संधीच्या या सीईटी परीक्षेमध्ये ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. हे सर्व विद्यार्थी राज्यातील असून राज्याबाहेरील एकाही विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले नाहीत. सदरचा निकाल विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
एमबीए-एमएमएसच्या दुसऱ्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा ९ मे २०२६ रोजी दोन सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण ५३ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत दोन सत्रात मिळून ४१ हजार ४४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २२ हजार ८९६ विद्यार्थी आहेत व १८ हजार ५४३ विद्यार्थिनी आहेत तर १ तृतीयपंथी आहे. याला ७६.८४ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३९ हजार ७२५ तर राज्याबाहेरील १७१५ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील १६५ परीक्षा केंद्रावर संगणकाधारीत पद्धतीने घेण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही.
१०० पर्सेंटाईल गुण मिळविणारे ४ विद्यार्थी
एमबीए-एमएमएसच्या दुसऱ्या संधीच्या या सीईटीमध्ये एकूण ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. नांदेड येथील कणव मौदगील, वर्धा येथील नरेश कार्तिक मंत्री, चंद्रपूर येथील श्रेयस विनय त्रिपाठी व वर्धा येथील क्रितांश सिंग या राज्यातील विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. हे चारही विद्यार्थी राज्यातील आहेत.