औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांसाठी मंत्री मंगल प्रभात लोढांचा महत्वाचा निर्णय (फोटो सौजन्य-X)
मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे असे लेखी निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना दिले. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर लोढा यांनी पत्राची तातडीने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने सुद्धा या संदर्भात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदर विषयाबाबत भेट घेतली. सद्यस्थितीत अनेक औ. प्र. संस्थांमध्ये तासिका तत्वावर कार्यरत निदेशकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात असल्याने, त्यांना परीक्षा घेऊन नियमित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. तासिका तत्वावर काम करणाऱ्या निदेशकांची ५ वर्षे व त्याहून अधिक काळ ज्यांची सेवा झाली आहे किंवा किमान पात्रता (ITI, CTI, पदविका व पदवी) धारण करतात, त्यांची परीक्षा घेऊन नियमित करण्यात यावे असे निवेदन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने केले आहे.
दरम्यान, गेली अनेक वर्षे तुटपुंज्या मानधनात आयटीआयमधील कौशल्य प्रशिक्षण व कुशल कारागीर घडविण्याचे हे काम निदेशक करत आहेत. राज्यामध्ये जवळपास 60 टक्के पदे ही आयटीआयमध्ये निदेशकांची आहेत. असे असतानाही त्यांना अनेक वर्षे काम करूनही प्रमाणपत्र देखील देण्यात येत नाही. असे असतानाही निदेशकांच्या जागी होणाऱ्या पदभरतीमुळे दुसरीकडे महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीने राज्यातील शासकीय आयटीआयमधील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या निदेशकांना कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने सामावून घ्यावे, अशी मागणीही शिक्षण संचालकांकडे केली जात होती.