
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? 'या' तारखेला होणार फैसला
१६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपचे ११ सदस्य असल्याने विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी भाजपमध्येच मोठी रस्सीखेच सुरू आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेले अनुभवी नगरसेवक अभिषेक बारणे, संदीप कस्पटे आणि बाबासाहेब त्रिभुवण यांची नावे चर्चेत असून, पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी आणि महिलांचे वर्चस्व
यावेळी भाजपने ‘धक्कातंत्र’ वापरत अनेक ज्येष्ठ सदस्यांना बाजूला सारून सात पहिल्यांदाच निवडून आलेल्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे, समितीमध्ये सात महिला सदस्यांचा समावेश करून भाजपने महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
हे सुद्धा वाचा : अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…
पक्षीय बलाबल
स्थायी समितीमधील १६ सदस्यांचे पक्षीय समीकरण खालीलप्रमाणे आहे:
भाजप : ११ सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ०४ सदस्य
शिवसेना (शिंदे गट): ०१ सदस्य
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय
पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. महापौर रवि लांडगे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे स्मारक उभारण्याची सूचना केली होती, ज्याला सर्वच पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चिंचवड येथील डी-मार्ट समोर ३३.८६ एकर जागेवर महापालिकेची नवीन इमारत साकारत असून, त्यातील ८.६५ एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. महापौर रवि लांडगे यांनी या कामाची तातडीने संयुक्त पाहणी करून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयाबद्दल महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून, हा निर्णय शहराच्या एकात्मतेला बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.