फोटो सौजन्य - Social Media
नेहा जैन या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. बालपणापासूनच त्यांना मोठं होऊन काही तरी हटके आणि समाजासाठी उपयोगी काम करायचं होतं. त्यांच्या घरात सर्व सुविधा नव्हत्या, परंतु शिक्षणाबद्दलचा आग्रह, आई-वडीलांचा प्रोत्साहन आणि भावाने दिलेला मानसिक आधार यामुळे त्या आपल्या ध्येयाशी ठाम राहिल्या.
मध्यप्रदेशात त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी दिल्ली गाठली. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेहाला एका आयटी कंपनीत चांगली नोकरी मिळाली. पण ती नोकरी त्यांच्या स्वप्नाशी सुसंगत नव्हती. त्यांनी नोकरी करतानाच UPSC च्या परीक्षेची तयारी सुरू ठेवली. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून रात्री अभ्यास करणे, सुट्टीच्या दिवशी रिविजन करणे आणि कामाच्या वेळेत थोडाफार वेळ काढून चालू ठेवलेली तयारी हे सगळं करत असताना त्या अनेकदा थकून जायच्या, पण मनोबल कधीच ढळू दिलं नाही.
पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आले. तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःचं विश्लेषण केलं, काय चुकतं आहे याचा विचार केला आणि तिसऱ्या प्रयत्नासाठी नवीन जोमाने तयारीला लागल्या. या वेळेस त्यांच्या मेहनतीला यश मिळालं आणि त्यांनी १५२ वी रँक मिळवत UPSC पास केली. त्यामुळे त्या IPS अधिकारी बनल्या.
या संपूर्ण प्रवासात नेहाच्या भावाची भूमिका खूप महत्त्वाची होती. तिचा भाऊ स्वतः IAS अधिकारी आहे आणि त्याने नेहाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केलं, तिचा आत्मविश्वास वाढवला. जेव्हा अपयश आलं, तेव्हा त्यानेच तिला पुन्हा उभं राहायला शिकवलं. नेहा स्वतः सांगतात की, “मी माझ्या भावामुळेच खचून न जाता पुढे जाऊ शकले.” आज नेहा IPS अधिकारी म्हणून कार्यरत असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे काम करत आहेत. त्यांची कहाणी ही आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायक आहे. जिथे ध्येय, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतीही अडचण पार करता येते. UPSC सारखी कठीण परीक्षा तीन वर्षांत, नोकरी करत करत पार करणे सोपी गोष्ट नव्हती. पण ती जिद्द होती, देशासाठी काहीतरी करण्याची.