मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची 'इटली'वारी! (Photo Credit- AI)
सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये हे विद्यार्थी अध्ययनासाठी इटली येथे रवाना होणार आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्या तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या व्यापक हितासाठी मुंबई विद्यापीठाने या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
मुंबई विद्यापीठातील युरोपियन अभ्यास केंद्र हे आशियातील एकमेव ‘इरासमस मुंडूस’ अंतर्गत युरोपियन लिटररी कल्चर्स या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संचालन करणारे केंद्र आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात या अभ्यासक्रमातील दोन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी मुंबई विद्यापीठात अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. विशेष म्हणजे इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत इटालियन नागरिक डॉ. अॅना फेरारा यांची सहा वर्षांसाठी पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
Teacher Recruitment 2026 : शिक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ राज्यात बंपर रिक्त पदांची भरती
याशिवाय, सन १०८८ मध्ये स्थापन झालेल्या आणि युरोपमधील सर्वात जुने मानल्या जाणाऱ्या बोलोनिया विद्यापीठासोबत ‘इरासमस प्लस’ आंतरराष्ट्रीय क्रेडिट मोबिलिटी प्रोग्राम अंतर्गत मुंबई विद्यापीठातील एम.ए. (फ्रेंच) तृतीय सत्रातील एका विद्यार्थ्यांला पाच महिन्यांसाठी इटलीत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांला दरमहा ८५० युरो शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क माफी तसेच ये-जा विमानप्रवास खर्च दिला जातो. मुंबई विद्यापीठाच्या सामंजस्य करारामुळे परदेशात मिळवलेले शैक्षणिक गुण मुंबई विद्यापीठात हस्तांतरित केले जात असून विद्यार्थ्यांना चौथे सत्र येथे पूर्ण करणे सुलभ होते.
मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये मिळालेल्या या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना केवळ भाषा व संस्कृतीचे ज्ञानच नव्हे, तर जागतिक दृष्टीकोन विकसित करण्याचीही मोठी संधी मिळणार असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता निश्चितच अधिक बळकट होईल असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत






