देशभरात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा (फोटो सौजन्य-X)
Narendra Modi News in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केले. याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त 51,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण आज करण्यात आले. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये या तरुणांच्या कारकिर्दीतील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होते आहे, असे पंतप्रधानांनी आजच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले. देशाची आर्थिक चौकट मजबूत करणे, अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देणे आणि कामगारांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडवणे, अशी आवश्यक कर्तव्ये पार पाडण्याचे काम या तरुणांना करावयाचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. तरुण ज्या प्रामाणिकतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील त्याचा भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित कले. नव्याने कामावर रूजू होणारे तरुण अत्यंत समर्पण भावाने त्यांची कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
“कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा आणि यशाचा पाया त्या देशाच्या तरुणाईच्या कामगिरीवर उभा असतो, जेव्हा तरुण राष्ट्र उभारणीत सक्रियपणे सहभागी होतात तेव्हा राष्ट्राचा वेगाने विकास होत असतो आणि ते राष्ट्र जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करते”, असे मोदी यांनी अधोरेखित केले. “भारतातील तरुण त्यांच्या कठोर परिश्रम आणि नवोन्मेषाद्वारे जगासमोर आपली अफाट क्षमता दाखवत आहेत”, असे त्यांनी अधोरेखित केले. सरकार प्रत्येक टप्प्यावर देशातील तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढत राहतील याची खात्री करत आहे, असे ते म्हणाले. कुशल भारत, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या उपक्रमांमुळे तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. या मोहिमांद्वारे, सरकार भारतातील तरुणांना त्यांची प्रतिभा जगाला दाखवण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, असेही ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे, या दशकात, भारतातील तरुणांनी तंत्रज्ञान, डेटा आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात देशाला आघाडीवर नेले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी यूपीआय ओएनडीसी आणि जेम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) सारख्या डिजिटल व्यासपीठाच्या यशावर प्रकाश टाकला. डिजिटल अर्थव्यवस्थेत युवा वर्ग परिवर्तनकारी बदल कसे घडवत आहेत हे या व्यासपीठाद्वारे दर्शवले जात आहे, असेही ते म्हणाले. भारत आता रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये जगात आघाडीवर आहे आणि या यशाचे मोठे श्रेय तरुणांना जाते, असे त्यांनी सांगितले.
या वाढीचे अनेक पैलू आहेत, ज्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे येत्या काळात सर्व क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधींमध्ये वाढ असल्याचे ते म्हणाले. अलिकडच्या काळात, ऑटोमोबाईल आणि पादत्राणे उद्योगांनी उत्पादन आणि निर्यातीत नवीन विक्रम स्थापित केले आहेत, ज्यामुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पहिल्यांदाच, खादी आणि ग्रामोद्योगातील उत्पादनांनी 1.70 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात लाखो नवीन रोजगार निर्माण झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी अंतर्देशीय जलवाहतुकीतील अलिकडच्या लक्षणीय कामगिरीवर भाष्य केले, यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की 2014 पूर्वी, अंतर्देशीय जलवाहतुकीद्वारे दरवर्षी केवळ 18 दशलक्ष टन मालवाहतूक केली जात होती. या वर्षी, मालवाहतुकीची संख्या 14500 कोटी टनांपेक्षा जास्त झाली आहे. पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय भारताने या दिशेने सातत्यपूर्ण धोरणात्मक आणि निर्णय घेण्याची जी पद्धत स्वीकारली, त्याला दिले. देशात राष्ट्रीय जलमार्गांची संख्या 5 वरून 110 वर पोहोचली आहे आणि या जलमार्गांची परिचालन लांबी अंदाजे 2,700 किलोमीटरवरून जवळपास 5,000 किलोमीटरपर्यंत वाढली आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. या कामगिरीमुळे देशभरातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेनुसार, 15वा रोजगार मेळा देशभरातील 47 ठिकाणी आयोजित केला जाईल. यामुळे तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध होतील. देशभरातून निवडलेले नवनियुक्त तरुण- तरुणी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये/विभागांमध्ये सामील होतील ज्यात महसूल विभाग, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, रेल्वे मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय इत्यादींचा समावेश आहे.