फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील विजाभज (विमुक्त जाती-भटक्या जमाती), इमाव (इतर मागास वर्ग), व विमाप्र (विशेष मागास प्रवर्ग) या घटकातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयात सादर करावा.
ही योजना पदव्युत्तर, पदव्युत्तर पदविका व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी असून QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये २०० क्रमांकात असणाऱ्या परदेशी संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या किंवा घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दरवर्षी अशा ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. योजनेनुसार अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे आणि पदवी परीक्षा किंवा पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवलेले असावेत.
महिला उमेदवारांसाठी ३०% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. एका कुटुंबातील केवळ दोन मुलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. विवाहित महिलांसाठी पतीकडील उत्पन्न दाखवणे बंधनकारक आहे. जर अर्जदाराचे आईवडील घटस्फोटित, विधवा/विधुर असतील, तर त्याची कागदपत्रे जोडावी लागतील. याशिवाय अर्ज करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात प्रवेशित असावे; मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात शिष्यवृत्ती मिळाल्यास पूर्ण कोर्स कालावधीसाठी ती लागू होणार नाही.
शिष्यवृत्तीच्या लाभामध्ये शिक्षण संस्थेच्या संपूर्ण फीचा समावेश असून ती थेट संस्थेला अदा केली जाईल. निवासासाठी यूएसए व इतर देशांसाठी (यूके वगळून) १५०० डॉलर आणि यूकेसाठी ११०० पाउंड निर्वाह भत्ता दिला जाईल. आरोग्य विम्यासाठी व परतीच्या विमान प्रवासासाठीही शासनाकडून खर्च परत केला जाईल.
ही संधी म्हणजे गुणवंत, पण आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचा सुवर्णद्वार आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.