
फोटो सौजन्य - Social Media
जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२५-२६ यशस्वीरीत्या पार पडली. रायगड मिलिटरी स्कूलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा प्रभाकर कुंटे सभागृह, रायगड मिलिटरी स्कूल, न्यू लिंक रोड, ओशिवरा, जोगेश्वरी (पश्चिम) येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत १७ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध वजनगटांमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी आपल्या ताकदीसोबतच शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे शानदार प्रदर्शन केले. उपस्थित प्रेक्षकांनी खेळाडूंच्या कामगिरीला उत्स्फूर्त दाद दिली. शालेय स्तरावर पॉवरलिफ्टिंगसारख्या ताकदीच्या खेळाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, भविष्यात या खेळात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल होण्याची आशा व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त राजीव घरत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात मोबाईल गेम्सकडे वळत असून ही बाब चिंतेची आहे. शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मैदानी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. त्यांनी क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, धावणे, बॅडमिंटन, गोल्फ, नेमबाजी (शूटिंग रेंज – पिस्तूल व रायफल), कुस्ती, बॉक्सिंग, टेनिस, टेबल टेनिस, सायकलिंग, स्केटिंग आणि बुद्धिबळ अशा विविध आऊटडोअर खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. भविष्यात तरुणांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी संघटना खेळाचे मैदान, प्रशिक्षण आणि आवश्यक क्रीडा उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी समन्वय व सहकार्य करेल, असे आश्वासनही राजीव घरत यांनी दिले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील गुणवान खेळाडूंना व्यासपीठ मिळून ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला सरचिटणीस अजय पाटणकर, प्राचार्य आरती झा, रचना घरत, मुंबई उपनगरीय क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे, अभिजीत गुरव, सचिव रक्षा मारव, तसेच शिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. एकूणच, जिल्हास्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड, स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा उपक्रमांमुळे क्रीडाक्षेत्रात नव्या दमाचे खेळाडू घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.