फोटो सौजन्य - Social Media
भारताचा आयटी क्षेत्र पुन्हा एकदा वेग पकडताना दिसत आहे. 2025 मध्ये आयटी नोकऱ्यांची मागणी वाढून सुमारे 18 लाखांपर्यंत पोहोचली आहे. या वाढीमागे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC)चा विस्तार तसेच नव्या डिजिटल तंत्रज्ञानामधील कुशल मनुष्यबळाची मोठी गरज ही प्रमुख कारणे ठरत आहेत. ताज्या अहवालानुसार, कंपन्या आता पारंपरिक कौशल्यांपेक्षा नव्या डिजिटल स्किल्स आणि अनुभवी व्यावसायिकांवर अधिक भर देताना दिसत आहेत. क्वेस कॉर्पच्या अहवालानुसार, 2025 मध्ये भारतातील आयटी नोकऱ्यांच्या एकूण मागणीत सुमारे 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML), सायबर सिक्युरिटी यांसारखी आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतातील वाढता विस्तार जबाबदार आहे. कंपन्या आता केवळ मोठ्या संख्येने भरती करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण आणि योग्य कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देत आहेत.
उभरती तंत्रज्ञान क्षेत्रे आयटी हायरिंगचे मुख्य केंद्र बनली आहेत. अहवालानुसार, 50 टक्क्यांहून अधिक आयटी भरती ही नव्या डिजिटल स्किल्सवर आधारित आहे. त्याउलट, पारंपरिक टेक स्किल्सचा वाटा एकूण मागणीत 10 टक्क्यांपेक्षाही कमी झाला असून, त्यामध्ये सातत्याने घट होत आहे. यावरून आयटी क्षेत्र वेगाने आधुनिक तंत्रज्ञानाकडे झुकत असल्याचे स्पष्ट होते. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) आयटी हायरिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 2025 मध्ये आयटी भरतीमध्ये GCCचा वाटा वाढून 27 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 2024 मध्ये हा वाटा केवळ 15 टक्के होता. यावरून परदेशी कंपन्या भारताकडे आता केवळ बॅक-ऑफिस म्हणून न पाहता, मुख्य तंत्रज्ञान केंद्र म्हणून पाहत असल्याचे दिसून येते.
वेगवेगळ्या क्षेत्रांतील हायरिंग ट्रेंड पाहता, प्रोडक्ट आणि SaaS कंपन्यांनी मर्यादित प्रमाणात भरती वाढवली आहे. आयटी सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग क्षेत्रात सौम्य वाढ दिसून आली आहे. मात्र, स्टार्टअप्समध्ये फंडिंगची कमतरता असल्याने हायरिंग घटून सिंगल डिजिटच्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि निधीचा थेट परिणाम रोजगारावर होत असल्याचे स्पष्ट होते. अनुभवी व्यावसायिकांची मागणी सध्या सर्वाधिक आहे. आयटी क्षेत्रात 4 ते 10 वर्षांचा अनुभव असलेल्या मिड-करिअर प्रोफेशनल्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही एकूण भरतीपैकी 65 टक्के आहे. 2024 मध्ये हा आकडा 50 टक्के होता. दुसरीकडे, फ्रेशर्ससाठीच्या नोकऱ्यांचा वाटा फक्त 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे.
शहरांबाबत बोलायचे झाल्यास, आयटी हायरिंगचा केंद्रबिंदू अजूनही टियर-1 शहरांभोवतीच आहे. 2025 मध्ये सुमारे 88 ते 90 टक्के भरती बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि दिल्ली-एनसीआर या प्रमुख शहरांमध्ये झाली आहे. तसेच, भरती प्रक्रियेसाठी लागणारा सरासरी कालावधी वाढून 45 ते 60 दिवसांपर्यंत गेला आहे. AI, ML आणि सायबर सिक्युरिटीसारख्या विशेष क्षेत्रांमध्ये भरतीसाठी अधिक वेळ लागत आहे. या पदांसाठी 75 ते 90 दिवसांपर्यंत कालावधी लागत असून, तीव्र स्पर्धा आणि कठोर स्किल असेसमेंट ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. यावरून कंपन्या योग्य टॅलेंट मिळवण्यासाठी अधिक वेळ आणि मेहनत घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट होते.






