
फोटो सौजन्य - Social Media
६२व्या व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत चुरशीच्या आणि थरारक लढती पाहायला मिळाल्या. पुरुष व्यावसायिक गटात मध्य रेल्वे, महिला व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वे, तर ४ फूट ११ इंच मुलांच्या प्रायोगिक गटात यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने अजिंक्यपद पटकावत स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली.
पुरुष व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पश्चिम रेल्वेला अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभूत करत विजेतेपद मिळवले. मध्य रेल्वेने २.४० मिनिटे राखून ठेवत १३-१२ असा १ गुणाने विजय नोंदवला. सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीत मध्य रेल्वेच्या विजयात दिलीप खांबी, मिलिंद चावरेकर, विजय हजारे आणि अरपाटणकर यांनी निर्णायक भूमिका बजावली. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेकडून महेश शिंदे, ऋषभ वाघ, निखिल सोडये, राहुल मंडल आणि मझहर जमादार (प्रत्येकी ३ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.
महिला व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने आक्रमक खेळाचे दमदार प्रदर्शन करत रचना नोटरी वर्क्स संघावर वर्चस्व गाजवले. पश्चिम रेल्वेने ६-४ असा एक डाय राखून २ गुणांनी दणदणीत विजय मिळवत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. विजेत्या पश्चिम रेल्वेकडून संध्या सुरवसे, अर्चना मांजी, तेजस्विनी के. आर., दिव्या गायकवाड, किशोरी मोकाशी, कल्याणी कंक आणि सुहानी धोत्रे यांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवले. पराभूत- शेवटपर्यंत दिली झुंज रचना नोटरी वर्क्स संघाकडून साक्षी वाफेलकर, गीतांजली नरस्राळे आणि साक्षी तोरणे यांनी लढाऊ खेळ केला, मात्र मोठा पराभव टाळण्यातच त्यांना समाधान मानावे लागले.
स्पर्धेतील सर्वात थरारक सामना ४ फूट ११ इंच मुलांच्या प्रायोगिक निमंत्रित गटात पाहायला मिळाला. अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्र आणि ओम साईश्वर सेवा मंडळ यांच्यात ५-५ अशी बरोबरी झाली. पूर्वार्धात २-२, उत्तरार्धात १-१ आणि जादा डावातही २-२ अशी समान स्थिती निर्माण झाली. अखेर लघुत्तम आक्रमणाच्या आधारे विद्यार्थी क्रीडा केंद्राने ४.४९ मिनिटे राखून ठेवत धरारक विजय मिळवला. विद्यार्थी क्रीडा केंद्राकडून विग्नेश जाधव, ओमकार जाधव आणि कार्तिक चोडणकर यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला. ओम साईश्वर सेवा मंडळाकडून सार्थक गामी, आरव साटम आणि श्लोक जाधव यांनी शेवटपर्यंत दिलेली झुंज प्रेक्षकांच्या टाळ्यांची कमाई करून गेली. या स्पर्धेमुळे जिल्हा स्तरावरील खो-खो खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, पुढील स्पर्धांसाठीही खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.