फोटो सौजन्य - Social Media
विवा महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “साईक स्पेक्ट्रम २०२५” या आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामध्ये शहरातील विविध महाविद्यालयांमधून १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि युवा मानसशास्त्राशी निगडित विषयांवर सर्जनशील अभिव्यक्ती केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रश्मी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यावेळी देशभरातील अनेक नामवंत महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विशेषतः सोनपंत दांडेकर महाविद्यालय (पालघर), एम. एच. मेहता महाविद्यालय (पालघर), आचार्य मराठे महाविद्यालय (चेंबूर), सेंट अँड्र्यूज कॉलेज (वांद्रे), भवन्स कॉलेज (चर्नी रोड) यांसारख्या ख्यातनाम महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपली सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि सध्याच्या सामाजिक प्रश्नांवरील भान दाखवून दिले.
या डिजिटल स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मीम मेकिंग, वन मिनिट वन ॲक्ट प्ले, डिजिटल व हस्तनिर्मित पोस्टर मेकिंग, कार्टून स्ट्रिप मेकिंग आणि रील मेकिंग अशा अनेक नवोन्मेषात्मक व आकर्षक प्रकारांमधून आपले विचार, अनुभव आणि सृजनशील अभिव्यक्ती सादर करता आली. विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य, युवा आरोग्य, अंमली पदार्थांचे व्यसन, तरुणांमध्ये लैंगिक जागरूकता, वित्तीय साक्षरता, क्रिप्टोकरन्सीचा प्रभाव, आर्थिक अस्थिरतेमुळे निर्माण होणारा तणाव, कौटुंबिक अपेक्षा आणि युवकांचे आर्थिक स्वातंत्र्य, लिंगभेद, सामाजिक जबाबदारी व संतुलित जीवनशैली यांसारख्या समकालीन आणि युवकांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व ज्वलंत विषयांवर सखोल विचार मांडले.
या संपूर्ण उपक्रमाचे उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजन मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रश्मी सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडले. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कु. शिवम वाल्मीकी याने नेतृत्व करत, प्रथम व द्वितीय वर्ष बी.ए. (मानसशास्त्र) विभागातील सुमारे ६० विद्यार्थ्यांच्या समर्पित कार्यसंघाने हे आयोजन अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहात पार पाडले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्याच्या मौल्यवान सहभागाबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, जे त्यांच्या कार्याची आणि सहभागाची अधिकृत ओळख बनली.
या उपक्रमाला विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्र ठाकूर, सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर ठाकूर, समन्वयक नारायण कुट्टी आणि व्यवस्थापन समिती सदस्य संजय पिंगुळकर, संजीव पाटील, श्रीनिवास पाध्ये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या डिजिटल महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना मानसिक आरोग्य आणि सामाजिक भान यांच्याबाबत जागरूक करत, त्यांच्या विचारांना एक मुक्त व्यासपीठ मिळाले.