'या' जिल्ह्यातील शाळा आज आणि उद्या राहतील बंद; वाढत्या पावसाच्या जोराने स्थानिक प्रशासनाने घेतला निर्णय
19 ऑगस्ट 2025 रोजी, राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा जोर पाहण्यात आला. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल अनेक तासांसाठी खोळंबली होती. त्यामुळे मुंबईकरांचे तसेच MMR परिसरातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे हाल झाले होते. पावसाचा वाढता जोर पाहता या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, दुसरा दिवस उगवला पण पावसाचा जोर मात्र काही कमी झाला नाही. त्या अनुषंगाने राज्यातील काही स्थानिक प्रशासनांनी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी 20 ऑगस्ट 2025 रोजी शाळा बंद राहणार असून तर काही ठिकाणी 21 ऑगस्ट रोजी ही शाळा बंद राहणार आहेत.
ठाणे जिल्हा हद्दीतील सर्व माध्यमातील शाळांना तसेच खाजगी व सरकारी शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी 20 ऑगस्ट 2025 या दिवसाकरिता असून पुढील निर्णय पावसाच्या जोरावर अवलंबून असेल जो लवकरच कळवण्यात येईल. त्याचबरोबर नवी मुंबई हद्दीतील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पावसाचा फटका सांगली जिल्हावरही पडला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, मिरज, पलूस या तालुक्यांमध्ये खाजगी तसेच सर्व सरकारी शाळांना 20 आणि 21 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याची विद्यार्थी तसेच पालकांनी नोंद घ्यावी. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना तसेच महाविद्यालयांना पावसाचे वाढते प्रमाण पाहून 20 ऑगस्टला सुट्टी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यावरही पावसाचा मोठा फटका
फक्त मुंबई आणि ठाणे नसून तर पावसाचा मोठा फटका पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणांवरही जाणवला होता. पुण्याच्या घाटमाथ्यांवर कोसळधार कोसळली होती. लोणावळा नगरपरिषदेने लोणावळा शहरातील सर्व शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर केली असून 21 ऑगस्ट रोजीही शाळा बंद असतील. पुण्यातील भोर, मुळशी, मावळ, जुन्नर, वेल्हा तसेच आंबेगाव तालुक्यातील सर्व माध्यमातील विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या