
indian army
Stanzin Tsangyang Indian Army News: पर्वतीय भागातील जीवन इतर ठिकाणांपेक्षा खूप वेगळे मानले जाते. त्यातही देशातील सर्वात बर्फाच्छादित प्रदेश असलेल्या लडाखचा विषय येतो, तेव्हा तेथील अडचणी आणि आव्हाने आणखी वाढतात. मात्र, अशाच कठीण परिस्थितीतून आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीने असा इतिहास रचला आहे, जो आजपर्यंत त्या भागातून कोणीही करू शकले नव्हते. ही तरुणी आहे स्टँझिन त्सांगयांग (Stanzin Tsangyang), जिने लडाख केंद्रशासित प्रदेशातील कारगिल जिल्ह्यातून भारतीय लष्करात पहिली महिला अधिकारी बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
भारतीय लष्कराच्या ‘आर्मी ट्रेनिंग कमांड’ने स्टँझिन यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी एक्सवर (X – पूर्वीचे ट्विटर) शेअर केली आहे. लष्कराने त्यांच्या प्रवासाला “पर्वतांपासून ऑलिव्ह ग्रीन्सपर्यंत: ऑफिसर कॅडेट (महिला) स्टँझिन त्सांगयांग यांची कहाणी” असे नाव दिले आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या झांस्कर खोऱ्यात, उत्तुंग पर्वत आणि कडाक्याच्या थंडीत जन्मलेल्या स्टँझिन यांनी बालपणापासूनच सहनशीलता आणि चिकाटीचे धडे घेतले. त्या कुटुंबातील सर्वात लहान अपत्य असल्याने सर्वांच्या लाडक्या होत्या; त्यांना कुटुंबाचे प्रेम आणि मातृभूमीच्या खंबीरपणाचा मोठा पाठिंबा मिळाला.
एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; CAT 2026 ची अर्ज प्रक्रिया आज संपणार!
उत्तम शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी अतिशय लहान वयात घर आणि गाव सोडले. त्यांनी लेह येथील ‘लॅमडॉन मॉडेल स्कूल’मधून (Lamdon Model School) आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी त्या सुमारे १४ वर्षे कुटुंबापासून दूर हॉस्टेलमध्ये राहिल्या. अभ्यासातील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली, ज्याच्या जोरावर त्यांनी आसाममधील प्रसिद्ध तेजपूर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
भारतीय लष्करात सामील होण्याचा त्यांचा प्रवास कॉलेजच्या दिवसांत NCC मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुरू झाला. तेथेच त्यांना प्रथमच आर्मी ऑफिसर बनण्याच्या विविध मार्गांची माहिती मिळाली. पूर्णपणे नागरी पार्श्वभूमीतून आल्यामुळे आणि कुटुंब किंवा समुदायात लष्करी सेवेचा कोणताही इतिहास नसताना ऑलिव्ह-ग्रीन वर्दी घालण्याचे स्वप्न पाहणे ही एक वेगळी गोष्ट होती. तरीही, देशसेवा करण्याची आणि आपल्या कुटुंबातील व भागातील पहिली लष्करी अधिकारी बनून वर्दी परिधान करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.
हा प्रवास अडचणी, आव्हाने, त्याग आणि आत्मसंशयाच्या क्षणांनी भरलेला होता, परंतु त्यांच्या पालकांचा खंबीर पाठिंबा आणि हिमालयाच्या पर्वतांनी दिलेल्या धैर्याने त्यांना नेहमी पुढे जाण्याची ताकद दिली.
काही दिवसांपूर्वींच ऑफिसर कॅडेट स्टँझिन त्सांगयांग यांनी कारगिल जिल्ह्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून पासिंग आऊट परेड ग्राउंडवर पाऊल ठेवले. देशातील अत्यंत दुर्गम आणि टोकाच्या भागातून पाहिलेली स्वप्नेही सर्वोच्च शिखरांपर्यंत पोहोचू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्टँझिन यांचा हा प्रवास आहे.