
फोटो सौजन्य - Social Media
ही यशोगाथा आहे जयपूरमधील २५ वर्षीय स्वाती पटेल यांची. कॉर्पोरेट क्षेत्रातील सुरक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी उद्योजकतेचा धाडसी मार्ग निवडला. अॅमेझॉन आणि रिव्होल्यूटसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करूनही स्वाती यांच्या मनात कायम स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. याच जिद्दीमुळे ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी अवघ्या १० हजार रुपयांच्या भांडवलावर ‘ग्रीन फॉरेस्ट’ (Green Forest) या स्टार्टअपची सुरुवात केली. लोकांना महागडे नव्हे, तर परवडणारे, ताजे आणि विदेशी प्रकारचे सॅलड उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश होता. अवघ्या तीन महिन्यांत ३ लाख रुपयांहून अधिक उलाढाल करून त्यांनी छोट्या कल्पनेतूनही मोठे यश मिळवता येते, हे सिद्ध करून दाखवले.
स्वाती पटेल या मूळच्या मध्य प्रदेशातील आहेत. त्यांनी इंदूर येथून बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर बंगळुरू येथील जैन विद्यापीठातून एमबीए केले. गेल्या पाच वर्षांपासून त्या जयपूरमध्ये वास्तव्यास आहेत. करिअरची सुरुवात त्यांनी टेक्निकल सपोर्टसारख्या भूमिकांमधून केली. मात्र नोकरी करत असतानाही त्यांच्या मनात उद्योजक होण्याची ओढ कायम होती. ‘ग्रीन फॉरेस्ट’पूर्वी त्यांनी आर्ट आणि हँडक्राफ्टेड डेनिम या क्षेत्रातही प्रयत्न केले, मात्र तो व्यवसाय मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरू शकला नाही.
२०२५ मध्ये स्वाती यांनी आपल्या खाण्याच्या आवडीला व्यवसायाचे रूप देण्याचा निर्णय घेतला. त्या स्वतःसाठी नियमितपणे हेल्दी सॅलड बनवत असत. त्यांच्या खास ड्रेसिंग्सची चव मित्र-मैत्रिणींना खूप आवडू लागली. सर्वांनी केलेल्या कौतुकानंतर स्वाती यांनी स्थिर नोकरी सोडून सॅलड स्टार्टअप सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी केवळ १० हजार रुपयांतून व्यवसाय सुरू केला. यामध्ये सुमारे ३ हजार रुपये भाज्यांसाठी, ६ हजार रुपये इतर कच्च्या मालासाठी खर्च करण्यात आले, तर उर्वरित रक्कम पॅकेजिंग आणि लेबलिंगसाठी वापरली. सुरुवात मात्र अजिबात सोपी नव्हती. जयपूरच्या जीटी सेंट्रल मार्केटमध्ये पहिल्याच दिवशी त्यांनी मोफत सॅम्पल वाटले. त्यानंतर एका कॉर्पोरेट ऑफिसबाहेर तब्बल तीन तास त्यांना नकारांचा सामना करावा लागला. तरीही त्या खचल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘पत्रिका गेट’ येथे स्टॉल लावला. सकाळच्या फेरफटक्यासाठी आलेल्या नागरिकांनी अवघ्या पाच मिनिटांत त्यांचे सर्व सॅलड खरेदी केले.
नंतर स्विगी आणि झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅप्सवर लिस्ट झाल्यानंतर त्यांना लक्षात आले की मोठ्या प्रमाणातील कमिशनमुळे त्यांचा ‘परवडणारा’ मॉडेल अडचणीत येत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दर कमी ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी या अॅप्सपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या व्हॉट्सअॅप आणि ऑफलाइन मार्केटिंगवर भर देत असून उबर आणि पोर्टरच्या माध्यमातून संपूर्ण जयपूरमध्ये डिलिव्हरी करतात.
स्वाती या मेयोनीज तसेच लसूण-कांदा न वापरता स्वतःच्या खास ड्रेसिंग्स तयार करतात. चुकंदर, पनीर चीज, चणे यांसारख्या घटकांपासून बनवलेली ही ड्रेसिंग्स ग्राहकांना विशेष आवडत आहेत. सप्टेंबरमध्ये दररोज १० ऑर्डरपासून सुरू झालेला प्रवास नोव्हेंबरमध्ये १२० ऑर्डर प्रतिदिनपर्यंत पोहोचला. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी ५ हजारांहून अधिक ऑर्डर पूर्ण करून ३ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. ५० रुपयांपासून २४९ रुपयांपर्यंत किमतीचे त्यांचे सॅलड आज जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. आरोग्यदायी अन्न प्रत्येकाच्या आवाक्यात असावे, हेच स्वाती यांचे अंतिम ध्येय आहे.