
फोटो सौजन्य - Social Media
स्तन कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लवकर व अचूक निदान ही प्रभावी उपचारांची गुरुकिल्ली ठरत असताना, टाटा मेमोरियल रुग्णालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाने सुसज्ज अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे तपासणी अधिक नेमकी होणार असून संशयास्पद गाठी व बदल सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे शक्य होणार आहे.
प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे (आयएएस) यांच्या हस्ते या अत्याधुनिक यंत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश, रेडिओडायग्नोसिस विभागाचे प्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. नवीन डिजिटल मॅमोग्राफी प्रणालीत टोमोसिंथेसिस आणि एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे स्तनातील अतिशय सूक्ष्म बदलही स्पष्टपणे टिपता येतात. विशेषतः घन स्तन ऊती (Dense Breast Tissue) असलेल्या महिलांमध्ये निदान करताना येणाऱ्या अडचणी या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. एआय आधारित विश्लेषणामुळे मानवी त्रुटींची शक्यता कमी होत तपासणी अधिक विश्वासार्ह ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना अश्विनी भिडे यांनी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. टाटा मेमोरियलसारख्या सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये अशा प्रगत यंत्रणांचा समावेश झाल्यास लवकर निदान शक्य होऊन उपचार अधिक प्रभावी ठरतात, असे त्यांनी नमूद केले. स्तन कर्करोगासारख्या आजारांमध्ये वेळेत निदान जीवन वाचविण्यास निर्णायक ठरते आणि त्या दृष्टीने हे यंत्र महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी स्तन कर्करोगाच्या उपचारांमध्ये नियमित तपासणी आणि शीघ्र निदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. नव्या एआय-आधारित मॅमोग्राफी प्रणालीमुळे तपासणी प्रक्रिया अधिक अचूक होऊन रुग्णांना लवकर उपचार सुरू करता येतील, असे त्यांनी सांगितले.
टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी या यंत्रामुळे तपासणी सेवा अधिक सक्षम होऊन रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले. तर रेडिओडायग्नोसिस विभागाचे प्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी यांनी उच्च दर्जाचे प्रतिमांकन आणि एआय आधारित विश्लेषण यांचा संगम कर्करोग उपचारांच्या साखळीत महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगितले. देशातील कर्करोग उपचार व संशोधनातील अग्रगण्य संस्था असलेल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात या अत्याधुनिक यंत्राच्या समावेशामुळे स्तन कर्करोगाच्या निदान प्रक्रियेत नवा मानदंड प्रस्थापित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकर निदान, अचूक तपासणी आणि प्रभावी उपचार यामुळे अनेक महिलांचे प्राण वाचण्यास ही प्रणाली मोलाची ठरणार आहे.