ठाणे/स्नेहा जाधव, काकडे : मंगळवारी महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल लागला आहे. राज्यात यंदाही कोकण प्रांतानी अव्वल स्थान पटकावले आहे. २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत ठाणे महापालिकेच्या एकूण २३ माध्यमिक शाळांचा निकाल ९१.९८ टक्के लागला आहे. गतवर्षी हे प्रमाण ८३.९४ टक्के एवढे होते. या वर्षी महापालिकेच्या चार माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधून १३२३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळा क्रमांक १५, किसननगर, शाळा क्रमांक १६, सावरकर नगर, शाळा क्रमांक १८, ज्ञानसाधना, शाळा क्रमांक १९ सावरकर नगर यांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी दिली. त्याचबरोबर, महापालिकेच्या चार शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. तर, मराठी माध्यमाचा एकूण निकाल ८०.६७ टक्के लागला आहे. रात्र शाळांचा (मराठी माध्यम) निकाल ६२.५० टक्के एवढा आहे. उर्दू माध्यमाचा निकाल ९७.७८ टक्के, इंग्रजी माध्यमाचा निकाल ९२.४७ टक्के आणि हिंदी माध्यमाचा निकाल ५९.३७ टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या तीन संधी उपलब्ध होणार आहेत. जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज १५ मेपासून करता येणार आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले. 28 हजार 12 खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच ९ हजार ६७३ अपंग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी परिक्षेला बसले असून त्यापैकी ८ हजार ८४८ उत्तीर्ण झाले. शरद गोसावी म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ९२.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे.