
फोटो सौजन्य - Social Media
बारामती येथील शारदानगरमधील शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अप्पासाहेब पवार सभागृहात नुकतेच पाच दिवसीय राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशन उत्साहात पार पडले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन व कौशल्याधारित प्रशिक्षण देणे, हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश होता. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी राजेंद्र पवार, प्रफुल्ल पाठक, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसचे तुषाबा शिंदे, तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात आंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सक्रिय सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या एकूण सात विद्यार्थ्यांनी या अधिवेशनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये अंकित भगत, दीपाली जाधव, रोहिणी पागी, वैभव नोक्ती, रोहित कनोजा, प्रतीक्षा दातेला व नम्रता खुताडे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी विविध सत्रांमध्ये सहभाग घेऊन कौशल्यविकासाशी संबंधित माहिती आत्मसात केली. अधिवेशनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्रे तसेच प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या कृतिशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेषतः मिलेट प्रोसेसिंग, नर्सरी व्यवस्थापन, हायड्रोपोनिक्स, भाजीपाला उत्पादन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, ड्रोन प्रशिक्षण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या विविध कौशल्याधारित प्रशिक्षणांवर भर देण्यात आला. या प्रशिक्षणांमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.
याच अधिवेशनात करिअर कट्टा प्रमुख प्रा. संतोष धामोणे यांनी “AI for Teacher” हा पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वीरीत्या पूर्ण केला. राज्यस्तरीय अधिवेशनात आंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग व त्यांची कामगिरी यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद सोनवणे आणि करिअर कट्टा प्रमुख प्रा. संतोष धामोणे यांनी विशेष प्रयत्न केले. समारोपप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करिअर कट्ट्यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असून त्यांच्या भविष्यासाठी ठोस दिशा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आवश्यक कौशल्ये आत्मसात करून ठरवलेल्या ध्येयाकडे वाटचाल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘स्वयंसिद्धा’ या कृतिशील उपक्रमात महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून आपली क्षमता सिद्ध केली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद सोनवणे तसेच सं. ग्रा. वै. व. सा. स. प्रतिष्ठान, ओदेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.