
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, या दूरदृष्टीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पित केलेला ‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’ (एसटीपी) वाशिम जिल्ह्यात शैक्षणिक परिवर्तन घडवत आहे. ग्रामीण तसेच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक संधी मिळाव्यात, या ठाम भूमिकेतून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या उपक्रमामुळे वाशिम जिल्ह्यातील तब्बल १७५ शाळांच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल झाला आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने, तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व वाशिम जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून ८ डिसेंबर २०२१ रोजी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ शाळांच्या भौतिक दुरुस्तीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण शाळा व्यवस्थेचे परिवर्तन घडविणारा सर्वसमावेशक शैक्षणिक मॉडेल ठरत आहे.
या प्रकल्पाअंतर्गत वाशिम जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषदांच्या उच्च प्राथमिक शाळांचे रूपांतर करण्यात आले आहे. पहिल्या ते चौथ्या टप्प्यात १२५ शाळांचा समावेश करण्यात आला असून, पाचव्या टप्प्यात आणखी ५० शाळा या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमध्ये समतोल पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ‘कोणताही तालुका, कोणतीही शाळा विकासापासून वंचित राहू नये’ या मुख्यमंत्र्यांच्या धोरणानुसार हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या ‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’चा थेट लाभ वाशिम जिल्ह्यातील २५ हजार ०५५ विद्यार्थ्यांना होत आहे. यासोबतच १ हजार ०९२ शिक्षक, १७५ मुख्याध्यापक, १ हजार ४३८ शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आणि ३ हजार ३७८ महिला विविध प्रशिक्षण व सहभागात्मक उपक्रमांमुळे अधिक सक्षम होत आहेत. शिक्षकांचे अध्यापन कौशल्य वाढवणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि पालक व समुदायाचा शाळेशी असलेला सहभाग वाढवणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालये, गणित व क्रीडा साहित्य, सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छ व सुसज्ज शौचालये, तसेच सौरऊर्जेवर आधारित विद्युतपुरवठा अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांचे वातावरण अधिक आकर्षक, सुरक्षित आणि शिकण्यासाठी पोषक बनले आहे.
मात्र, या प्रकल्पाचा खरा आत्मा केवळ इमारती किंवा भौतिक सुविधांपुरता मर्यादित नाही. शिक्षक, विद्यार्थी आणि समुदाय यांच्या सहभागातून शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था न राहता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची केंद्रे बनत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला ‘स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’ वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना आधुनिक, सक्षम आणि स्पर्धात्मक बनवत असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा देणारा ठरत आहे.