
Google AI machine learning solutions: आजच्या काळात जिथे लोक कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात, तिथे एका व्यक्तीने तब्बल ९.३ कोटी रुपयांची वार्षिक नोकरी सोडून स्वतःचा एआय (AI) स्टार्टअप सुरू केला आहे. अगदी अशीच गोष्ट गुगलचे माजी कर्मचारी ‘युसूफ इम्रान’ यांची आहे. ज्यांनी नोकरीच्या सुरक्षिततेपेक्षा स्वतःच्या स्वप्नांवर आणि नवीन संधींवर विश्वास ठेवला.
४१ वर्षीय युसूफ इम्रान हे गुगलच्या सिलिकॉन व्हॅली मुख्यालयात ‘अकाउंट एक्झिक्युटिव्ह’ म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांची एकूण वार्षिक कमाई सुमारे ९.८६ लाख डॉलर्स (अंदाजे ९.३२ कोटी रुपये) होती. यामध्ये त्यांचा मूळ पगार १.७० लाख डॉलर्स होता, तर उर्वरित मोठी रक्कम सेल्स कमिशनमधून मिळाली होती. मात्र, एआय क्षेत्रातील वेगवान प्रगती पाहता, त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये गुगलला रामराम ठोकला.
युसूफ यांचे बालपण बांगलादेशात गेले, त्यानंतर त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले. सेल्स क्षेत्रात २० वर्षांचा अनुभव असलेल्या युसूफ यांनी २०२० मध्ये गुगल जॉईन केले. तिथे ते कंपन्यांना गुगलचे एआय सोल्यूशन्स वापरण्यास मदत करत असत. युसूफ यांच्या मते, गुगलमध्ये चांगला पगार मिळत असूनही त्यांना एआय क्षेत्रातील क्रांतीमुळे त्यांना काहीतरी सुटण्याची भीती सतत जाणवू लागली होती. त्यातच गुगलमध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे (Layoffs) मोठ्या कंपन्यांमधील नोकरीही कायम सुरक्षित नसते, याची त्यांना जाणीव झाली.
गुगलमध्ये नोकरी करत असतानाच, युसूफ रात्री आणि वीकएंडला ‘ChatGPT’, ‘Claude’ आणि ‘Gemini’ सारख्या एआय टूल्सवर विविध प्रयोग करायचे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची कोणतीही पदवी नव्हती. त्यांचे मानणे आहे की, आज कॉम्प्युटर सायन्सच्या पदवीपेक्षा तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील समस्यांची किती जाण आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.
गुगल सोडल्यानंतर त्यांनी ‘मँगोस्टीन स्टुडिओ’ (Mangosteen Studio) नावाचा आपला एआय स्टार्टअप सुरू केला. ही कंपनी सेल्स प्रोफेशनल्स आणि सेल्स टीम्ससाठी एआय-आधारित टूल्स तयार करते, ज्यामुळे कंपन्यांना त्यांचे ग्राहक वाढवणे आणि डील जलद गतीने पूर्ण करणे सोपे होते. तंत्रज्ञानाच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी इंजिनिअरिंग बॅकग्राउंड असणे गरजेचे नाही, हेच युसूफ यांनी दाखवून दिले आहे.