
सहलीला गेलेल्या 22 विद्यार्थ्यांना विषबाधा; 3 विद्यार्थी गंभीर, ICU मध्ये उपचार सुरु
धाराशिव : वाळूज परिसरातील एका शाळेच्या वतीने सहलीला गेलेल्या 40 विद्यार्थी व पाच शिक्षकांपैकी एक शिक्षक व 22 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. त्यांच्यावर सुप्याच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये एक शिक्षक व तीन विद्यार्थी गंभीर असल्याने त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. ही अत्यंत खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली.
वाळूज परिसरातील यशवंतराव माध्यमिक विद्यालय, रांजणगाव (शेणपुंजी) या शाळेची शैक्षणिक सहल १५ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाच्या (एम एच २०, एम एच ४३६६) या बसने रांजणगाव येथून कोकणात गेली होती. काशीद बीच, मुरुड जंजिरा, प्रतापगड, रायगड, महाबळेश्वर, महाड, जेजुरी, मोरगाव असा या सहलीचा रूट होता. या शैक्षणिक सहलीमध्ये ४० विद्यार्थी व पाच शिक्षकाचा समावेश होता. शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी रायगड फिरून आल्यानंतर सहलीतील विद्यार्थ्यांनी रात्री जेवण केले. त्यानंतर ते परतीच्या मार्गाला लागले असता चाळीस विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांना व पाच शिक्षकांपैकी एका शिक्षकाला मळमळ उलट्या सुरू झाल्या.
हेदेखील वाचा : जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण
बसमधील जवळजवळ अर्ध्या जणांची प्रकृती खराब झाल्याने हा विषबाधेचा प्रकार असावा असे मानले जात आहे. विषबाधा झालेल्या सर्वांना रस्त्यातच सुपा येथील निरामय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यातील विद्यार्थी व शिक्षक मिळून एकूण तीन गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये उपचार करण्यात आले. या खळबळजनक घटनेविषयी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे. परिणामी, या घटनेमुळे वाळूज परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
सहलीच्या प्रवासामध्ये त्रास झाला असावा
या विषबाधेबाबत विद्यार्थ्यांसोबत सहलीला गेलेल्या एका शिक्षकांशी संपर्क साधला असता ते सुद्धा आजारी असल्याचे समजले. त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता दुसऱ्या एका शिक्षकांनी फोन उचलून सांगितले की, हा किरकोळ प्रकार आहे. प्रवासामध्ये विद्यार्थ्यांना त्रास झाला असावा, असे त्यांनी सांगितले.
दक्षता घेतली पाहिजे
सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी त्या त्या शाळेच्या शिक्षकांची किंवा आयोजकाची असते. मात्र, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी याबाबत काळजी न घेतल्यामुळे हा प्रकार झाल्याचे प्रथमदर्शिनी दिसत आहे. हॉटेल मालकावर व शिक्षकांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा.