जलजीरा प्राशनाने ७ मुलींना विषबाधा (File Photo : Food Poison)
गोंदिया : जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.20) दुपारच्या सुमारास घडली. 10 ते 11 वयोगटातील मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शाळेत दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर शाळेजवळील किराणा दुकानातून जलजीरा विकत घेतला. हा जलजीरा प्यायल्यानंतर काही वेळातच मुलींना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर मुख्याध्यापिका अंजना हरीणखेडे यांनी त्वरित लक्ष देत मुलींना कुराडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना केवळ पाथरीपुरती मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण भागातील किराणा व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जलजीरा ‘एक्सपायर्ड’ होता आणि त्यामुळे फूड पॉयझनिंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या विद्यार्थिनींना विषबाधा झाली, त्यांची नावे आरजू कटरे, अंशिका कडाम, निधी नागफासे, प्राची येळे, स्वाती मेश्राम, चेतना साडीले, त्रिशा अशी आहेत. संबंधित जलजीरा किराणा स्टोअर्समधून घेतल्याचे समोर आले.
तत्काळ कारवाई अपेक्षित
ग्रामीण भागातील अनेक दुकानांमध्ये कालबाह्य वस्तू विक्रीसाठी ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून अन्न व औषध प्रशासन, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त तपास करून कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांची आहे.
दुकानावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी
गावकऱ्यांनी दुकानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी भावना ग्रामस्थांची आहे. शाळेच्यावतीने गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस दुकानदाराकडे वैध परवाना आहे की नाही, इतरही कालबाह्य वस्तू दुकानात आहेत का? याचा तपास करत आहेत.