
वृद्धाला जाळ्यात ओढून घेतले पैसे
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच नागपूर शहरातील एका तरुणीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. या तरुणीने एका वृद्धाला जाळ्यात अडकवले, लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळू लागली. अखेर या ज्येष्ठ नागरिकाने बिबवेव्हाडी पोलिसात तक्रार केली. गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली.
हर्षला राकेश डेंगले (वय २८, रा. न्यू ओमनगर, हुडकेश्वर) असे अटकेतील तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून काही पैसेही वसूल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने एका वृत्तपत्रात लग्नाशी संबंधित जाहिरात वाचली होती. त्यांनी त्या जाहिरातीत दिलेल्या नंबरवर १८ एप्रिल २०२५ रोजी संपर्क केला. कॉलवर बोलणाऱ्या हर्षला डेंगले हिने तिचे नाव ममता जोशी सांगितले आणि हळूहळू वृद्धाशी मैत्री केली. काही दिवसांनी तिने कोल्हापुरात असल्याची माहिती देत पैशांची मागणी केली. तिने तिच्या मावशीच्या मुलीचा अपघात झाला आहे आणि उपचारासाठी तत्काळ पैशांची आवश्यकता आहे.
पुण्याला परतल्यानंतर पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ती वेगवेगळे बहाणे सांगून वृद्धाकडून पैसे उकळत गेली. तिने ऑनलाईन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून वृद्धाकडून एकूण ११ लाख ४७ हजार रुपये घेतले. दरम्यान, तिच्याकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने वृद्धाला संशय आला आणि त्यांनी १ जून रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
न्यायालयातून मिळाला जामीन
तांत्रिक तपासात वृद्धाची फसवणूक करणारी हर्षला डेंगले असून, ती नागपुरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ पोलिसांचे एक पथक नागपूरला पोहोचले आणि तिला अटक केली. पोलिसांनी हर्षलाकडून ३ मोबाईल फोन आणि ११ लाख ४५ हजार रुपये जप्त केले, अटकेनंतर तिला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला.
जाहिरातींची खात्री करूनच ठेवा विश्वास
सध्या लग्नाच्या नावावर सोशल मीडिया आणि इंटरनेटवर फसवणुकीचे प्रकरण वाढत चालले आहे. अशा कोणत्याही मेसेज किंवा जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करून घ्या. जर लग्नासाठी नोंदणी करायची असेल तर केवळ अधिकृत वेबसाईटचा वापर करा आणि व्यक्तिगत माहिती सावधगिरी बाळगूनच द्या, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा