बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पुण्यातून 6 जणांना पकडले
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील फरार शुभम लोणकर याच्या संपर्कातील सहा जणांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अद्याप ५ ते ६ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बाबा सिद्धीकी यांचा हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन घट्ट होत चालले आहे.
बाबा सिद्दिकी यांचा (दि. १२ ऑक्टोबर) दिसऱ्या दिवशी सायंकाळी तिघांनी गोळ्या झाडून खून केला. याप्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली होती. त्याची पोस्ट शुभम लोणकर यांच्या फेसबूकवरून केली गेली. नंतर पोलीस लोणकरचा शोध घेत होते. पण, त्याचा थांगपत्ता अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांनी लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली. दोघेही बिष्णोई गँगशी संबंधित असून, पुण्यात या खुनाचा कट रचल्याचा संशय आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बिष्णोई गँगची पाळेमुळे पुण्यात रुजल्याचे दिसून आले. बिष्णोई गँगचा राजस्थान येथे २०२२ मध्ये कॅम्प पार पडला होता. त्यात शुभम लोणकर उपस्थित होता. तेथेच त्याने बिष्णोई गँगमध्ये सहभागी होण्याचे पाऊल उचलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. लोणकर गेली काही वर्षे पुण्यात वास्तव्यास असून त्याच्या माध्यमातून बिष्णोई गॅंग शहरात फोफावत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सिद्दिकी खून प्रकरणानंतर मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात शुभम लोणकर यांच्याशी संबंधित अकरा ते बारा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील सहा जणांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.