'बदलापूर'ची पुनरावृत्ती! घरात एकटी असल्याची संधी साधत 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)
बदलापूर येथील घटनेनंतर राज्य सरकार आणि गृह विभाग यांच्या विरोधात समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत राज्यभर निदर्शने आणि आंदोलने झाली. मात्र अद्यापही त्या घटनांची पुनरावृत्ती सुरूच आहे. याचदरम्यान पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे . यामध्ये ३ वर्षीय चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चौदा वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिक्रापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीची आई घराबाहेर गेली होती. यावेळी पीडित मुलगी घरी एकटीच होती. याचाच फायदा घेत 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने घरात घुसून तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.
दरम्यान, पीडित मुलीची आई घरी आली असता आरोपीने पळ काढला. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चौदा वर्षीय तरुणावर बाल लैंगिक अत्याचारासह लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.
आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावळे व पोलीस नाईक उमेश जयपात्रा करीत आहेत.
दरम्यान, आज आणखी एक अमानुष घटना समोर आली आहे. येथे सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून एका तरुणीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हे चारही आरोपी एकमेकांना ओळखत नसून या चारही आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीवर अत्याचार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.