पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूरज देवेंद्रपंत लांडे (वय २७, रा. शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रणीत दिलीप गोंडेकर (वय २४, रा. योगानंद पीजी. हिंजवडी फेज एक) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रणीत अणि सूरज मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरुन निघाले होते. चांदणी चौकापासून काही अंतरावर त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली. दोघे लघुशंकेसाठी गेले. नंतर सूरज दुचाकी घेऊन विरुद्ध दिशेने निघाला. त्या वेळी समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनाने अंधारात दुचाकीस्वार सूरज याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सूरजचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस हवालदार शेलार अधिक तपास करत आहेत.
दीर- भावजयचा मृत्यू
पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिला पोलिसाला कारने उडवले
राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.