संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता किरकोळ वादातून दुचाकीस्वार व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार कसबा गणपती मंदिराजवळ घडला आहे. याप्रकरणी दोघांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत योगेश गोपाळजी ठक्कर (वय ४५, रा. भवानी पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ठक्कर रविवारी (२६ जानेवारी) कसबा गणपती मंदिरासमोरुन निघाले. मंदिराच्या परिसरात ते दुचाकी लावण्यासाठी जागा शोधत होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ठक्कर यांना शिवीगाळ केली. गाडी नीट चालव, असे सांगून दोघांनी ठक्कर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ठक्कर यांच्या पाठीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन दोघे जण पसार झाले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक; तब्बल 40 लाखांना घातला गंडा
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
निगडीत तरुणावर चाकूने हल्ला
गेल्या काही दिवसाखाली जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकूने वार करून जिवे मारण्याचाही प्रयत्न केलाय. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निगडी येथील चिकन चौक येथे घडली आहे. भरत भागवत म्हस्के (३४, राहुलनगर, निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हृतिक सकट, सचिन जाधव, धनंजय उर्फ बबलू सूर्यकांत रणदिवे, सूरज कोंडिराम ओव्हाळ, गणेश उबाळे, विशाल ऊर्फ दुग्गु शंकर वैरागे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील रणदिवे, ओव्हाळ व वैरागे यांना पोलिसांनी अटक केली आहे.