पुणे महापालिकेत दोन अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी; कारणही आलं समोर
पुणे : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या 30 सुरक्षा रक्षकांच्या बिलावरून सुरक्षा विभागाचे उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमध्ये झडप झाली. यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अतिरिक्त कामाचे बिल काढण्यावरुन दोन अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. विशेष म्हणजे दोन्ही अधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणारे पत्र मनपा आयुक्तांना दिले आहे.
पुणे मनपामध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे (एमएफएस) 30 सुरक्षा रक्षक अतिक्रमण विभागाकडे कार्य करत आहेत. त्यांचे वेतन अतिक्रमण विभागाकडून दिले जाते. मात्र, दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. त्यामुळे एमएफएसच्या अधिकाऱ्यांनी वेतन न दिल्यास सुरक्षा रक्षक परत घेतले जाईल, असा इशारा दिला होता. या सुरक्षा रक्षकांचे 26 दिवस भरतात. मात्र, त्यांचे 40 दिवसांचे बील सादर करण्यात आले आहे. त्यामुळे बिल थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. तर ही हे वेतन अदा करावे, असा आगृह एक अधिकारी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुरक्षा विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद लेटके यांच्यात सुरक्षा रक्षकांचे बिल काढण्यावरुन बनकर यांच्या दालनात हाणामारी झाली. लेटके यांनी बनकर यांना मोबाईल फेकून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर लेटके यांनी बनकर यांनी हाणामारी केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे पुणे मनपामध्ये या घटनेची चर्चा जोरदार सुरु होती.