पुण्यात कोथरूडमध्ये गोल्डन बेकरीला मध्यरात्री आग, लाखो रुपयांचे नुकसान; अडकलेल्या कामगारांची सुटका
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोथरूडमधील स्वामी विवेकानंद चौकात असलेल्या गोल्डन बेकरीला आज पहाटे अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बेकरीचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आग लागल्यामुळे कोथरुड भागात मोठी खळबळ उडाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच कोथरूड, एरंडवणे, वारजे, एनडीए येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाला शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
कोथरुडमधील श्री विठ्ठल कृपा या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यात विद्यूत व गॅसवर चालणारी गोल्डन बेकरी आहे. आग लागल्यानंतर बेकरीच्या आत सहा कामगार झोपेत होते. धुरामुळे ते जागे झाले आणि मदतीसाठी ओरडू लागले. जवानांनी आवाज ऐकून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. ही बेकरी एका इमारतीच्या तळमजल्यावर असून आतमधील साहित्याने पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. धुराचा त्रास होऊ नये म्हणून इमारतीतील रहिवाशांना देखील सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीमागील कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये म्हटलं…
शिवाजीनगरमध्ये पीएमपी बस जळाली
पुण्यातील शिवाजीनगरमध्येही आग लागल्याची घटना घडली आहे. नरवीर तानाजी वाडी (वाकडेवाडी) येथील पीएमपी आगारात शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका बसला आग लागली. आगीत बस जळून खाक झाली. जवानांनी घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्यापही समजले नाही.