संग्रहित फोटो
पुणे : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्योती ही मूळची राजस्थान येथील रहिवासी आहे. ती शिक्षणानिमित्ताने पुण्यात आलेली होती. ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तर कॉलेजच्या वसतिगृहात राहत देखील होती. दरम्यान, मंगळवारी रात्री हॉस्टेलमधील तिच्या खोली समोरील एका मोकळ्या खोलीत तिने गळफास घेतला. हा प्रकार इतर विद्यार्थ्यांनी पाहिला. लागलीच तिच्या सहकाऱ्यांनी आणि अधिवास कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येपूर्वी ज्योतीने सुसाईड नोट लिहिली आहे. ती पोलिसांनी जप्त केली आहे. ती नैराश्यात होती, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र, तिने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आई बाबा मला माफ करा
ज्योतीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये, मला शिकायचे आहे, पण माझ्याकडून होत नाही. मला माफ करा. असा आई-वडिलांना उद्देशून माफी मागणारा मजकूर लिहिला आहे. दरम्यान तिचा भाऊ राजस्थान येथून पुण्यात आला आहे. त्याच्या माहितीनुसार, ज्योतीवर मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरू होती, औषध-गोळ्या देखील सुरू होत्या. विद्यार्थिनी आठवीत असल्यापासूनच मानसिक रुग्ण होती. काही दिवसांपूर्वी तिने टक्कलही केल्याची माहिती समोर आली आहे.
वडगाव मावळमधील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून वडगाव मावळ येथील २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना २४ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रणजित देशमुख आणि अभिषेक ढोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, प्राण येवले याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.