पुण्यात प्रसिद्ध बिल्डराविरोधात फसवणुकीची तक्रार; नेमकं प्रकरण काय?
पुणे : महिन्याला दीड टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक अमित लुंकड यांच्यासह इतरांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत ही तक्रार दिली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अमित कांतीला लुंकड, अमोल कांतीलाल लुंकड आणि पुष्पा कांतीलाल लुंकड यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. याबाबत प्रविणचंद जैन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे.
लुंकड रियालटी नावाची लुंकड कुटुंबाची कंपनी आहे. सध्या ही कंपनी स्कायवन कार्पोरेट नावाने ओळखली जाते. जैन यांच्या तक्रारीनुसार, २००९ मध्ये जैन कुटुंबिय दिल्ली येथून पुण्यात वास्तव्यास आले. व्यावसायीक कारणानिमीत्ताने त्यांची ओळख अमित लुंकड यांचे वडील कांतीलाल लुंकड यांच्यासोबत झाली. कालांतराने त्यांच्यातील व्यावसायिक संबंध दृढ होत गेले. यावेळी लुंकड यांनी त्यांना लुंकड रियालिटीत गुंतवणुक करण्याचे आमिष दाखविले. अमित आणि अमोल लुंकड यांनी गुंतवणुक केल्यास प्रतिमहिना दीड टक्के परतावा देऊ असे त्यांना सांगितले. त्यानुसार २०१४-१५ दरम्यान जैन आणि त्यांच्या कुटुंबाने तब्बल ६ कोटी ६१ लाख रूपये गुंतवणुक केले.
हे सुद्धा वाचा : बॅटरी चोरायला गेला अन् जाळ्यात अडकला, नागरिकाने पाठलाग करुन पकडलं
सुरुवातीला लुंकड यांच्याकडून जैन कुटुंबियांना नियमीतपणे व्याज दिले गेले. मात्र २०१९ नंतर त्यांच्या पैसे देण्यात अनियमितता आली. यावेळी जेव्हा गुंतवणुकदारांनी त्यांना पैशाबाबत विचारणा केली तेव्हा त्यांना पैसे देण्याचे आश्वासन लुंकड यांच्या वतीने देण्यात आले. दरम्यान नुकताच २४ सप्टेंबर रोजी जैन यांना मिळालेला धनादेश रक्कम नसल्याने वटू शकला नाही. लुंकड कुटुंबियांनी त्यांचे ६ कोटी ८१ लाख ३२ हजार रूपये घेतले होते. त्यामुळे जैन यांना दिलेल्या रकमेसह १३ कोटी ४२ लाख ३२ हजार व्याज होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करत आहेत.
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तन्मय रमेश जाधव (रा. ओैंदुबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात ६१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांची एका परिचितामार्फत तन्मय जाधवशी ओळख झाली होती.