स्टील देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 10 लाखांचा घातला गंडा
कागल : घर बांधण्यासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दराने टाटा स्टील देण्याचे आमिष दाखवून ९ लाख ७६ हजार ९६० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत कागल येथील रमेश गणपती पन्हाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश पन्हाळकर कागल येथील अनंत रोटो नगरमध्ये घराचे बांधकाम करीत आहेत. त्यांना टाटा स्टीलची आवश्यकता असल्याने त्यांनी गुगलवर जाऊन टाटा स्टीलची माहिती सर्च करीत संशयित आरोपी रंजय कुमार याच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानी मी टाटा स्टील कंपनीचा जनरल मॅनेजर असल्याचे सांगितले. विपिन गुप्ता मुंबई विभागाचे सेल मॅनेजर आहेत. त्यांना संपर्क साधण्यास सांगितले. पन्हाळकर यांनी मोबाईलवरून विपिन गुप्ता यांच्याशी संपर्क साधला आणि घराच्या बांधकामासाठी आपल्या कंपनीकडून १६ टन ७०० किलो इतके स्टील लागणार असल्याचे सांगितले. त्यावर विपिन गुप्ता यांनी पन्हाळकर यांना मोबाईलवर इन्व्हाईस पावती व दर पत्रक पाठवून दिले.
हे सुद्धा वाचा : लग्नाळू तरुणांच्या जखमेवर मीठ; फसवणूक करणाऱ्या टोळीचा ‘असा’ केला पर्दाफाश
अशी झाली फसवणूक
बाजारभावापेक्षा स्वस्त दरात स्टील मिळत असल्याचे पाहून पन्हाळकर यांनी त्यांचे मेहुणे गोविंद बिरंजे यांच्याशी संपर्क साधला व विपिन गुप्ता यांच्याशी बोलायला सांगितले. त्यानुसार स्टील पाठवत असल्याचे सांगून गुप्ता यांनी बँक खाते क्रमांक दिले. त्या खात्यावर ९ लाख ७६ हजार ९६० रुपये पाठवण्यास सांगितले. पन्हाळकर यांनी ३० नोव्हेंबर रोजी कागल येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्नाटक बँक अंधेरी ईस्ट, मुंबई व २ डिसेंबर रोजी कॅनरा बँक शाखा अंधेरी ईस्ट या ठिकाणी आरटीजीएस करून पैसे पाठवले. मात्र पैसे पाठवूनही स्टीलचा पुरवठा झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तन्मय रमेश जाधव (रा. ओैंदुबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात ६१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांची एका परिचितामार्फत तन्मय जाधवशी ओळख झाली होती.