
कोंढव्यात टोळक्याची दहशत, दुकानाची तोडफोड; सायंकाळी नेमकं काय घडलं?
पुणे : ऐन दिवाळीतही गुन्हेगारीच्या घटना पुण्यात सुरुचं आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून टोळक्यांचा धुडगूस सुरुच आहे. टोळके परिसरात दहशत माजवून दुकांनांची तोडफोड करत आहेत. टोळक्यांचा बदोबस्त करण्याची गरज आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा भागात टोळक्याने दहशत माजवून दुकानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर तीक्ष्ण शस्त्रे उगारून आणि गोंधळ घालून दहशत माजवत मोठा राडा देखील घातला आहे. पोलिसांनी यानंतर तिघांना अटक केली आहे.
हामजा खान (वय २०), फिदा खान (वय २०), शाहरूख शेख (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर मोहम्मद युसुफ शेख (वय ४७, रा. मीठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, समीर शेख यांचे मीठानगर भागात दुकान आहे. आरोपी खान, शेख आणि साथीदार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मीठानगर परिसरात आले. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजविली. परिसरातील दुकानांच्या दरवाज्यावर लाथा मारल्या, तसेच एका चिकन विक्री दुकानाचा एलईडी फलक फोडला. एका भंगार माल दुकानाच्या बाहेर ठेवलेला टीव्ही फोडला. आरोपींनी दहशत माजविल्यामुळे नागरिक घाबरले. दुकानदारांन त्यांची दुकाने बंद केली. पसार झालेल्या आराेपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार
येरवडा परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. प्रेम विकी ससाणे (वय १९, रा. यशवंतनगर, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लक्ष्मीपुजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास यशवंतनगर भागात थांबला होता. त्यावेळी वैमनस्यातून आरोपी ससाणे आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलिस कर्मचारी कायगुडे तपास करत आहेत.