
फटाके वाजवताना वाद, तरुणावर शस्त्राने वार; रात्री नेमकं काय घडलं?
पुणे : देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता ऐन दिवाळीत पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरेगाव पार्क भागात फटाके वाजविताना झालेल्या वादविवादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ओंकार बसूराज कोळी (वय २६), शुभम बसूराज कोळी (वय २६, दोघे रा. दरवडे मळा, कोरेगाव पार्क ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत २३ वर्षीय तरुणाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) तक्रारदार तरुण आणि मित्र रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी ओंकार आणि त्याचा भाऊ शुभम घरासमोर फटाके वाजवत होते. फटाके वाजवण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपी कोेळी यांंनी तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपींनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक हंडाळ तपास करत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार
येरवडा परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. प्रेम विकी ससाणे (वय १९, रा. यशवंतनगर, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लक्ष्मीपुजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास यशवंतनगर भागात थांबला होता. त्यावेळी वैमनस्यातून आरोपी ससाणे आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलिस कर्मचारी कायगुडे तपास करत आहेत.