अकलूज : एटीएम मशीनच्या कॅमेऱ्यावर आणि सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून सिनेस्टाईलने चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून चोरी केल्याची घटना अकलूज येथे घडली आहे. चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील तब्बल २ लाख २० हजार ३०० रूपये चोरून नेले.
अकलूज पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गांधी चौक येथील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये सुमो गाडीतून चोरटे आले. त्यांनी अंगावर ब्लॅंकेट पांघरले होते. आपला चेहरा दिसू नये म्हणून सदर चोरट्यांनी प्रथम एटीएम मशीनच्या कॅमेऱ्यावर स्प्रेमधून काळा कलर मारला. त्यानंतर सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यावर काळा कलर मारला. सोबत आणलेल्या कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोख सुमारे २ लाख २० हजार ३०० रूपये चोरून नेले. याबाबत बँकेचे व्यवस्थापक अतिश अभिमन्यू देशमुख यांनी अकलूज पोलीसांत चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या चोरीचा अधिकचा तपास पोलीस निरिक्षक भानुदास निंभोरे हे करत आहेत.