
गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू
गंगापूर : गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यात गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हॉटेल विराज गार्डनसमोर रात्री उशिरा कार व दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
राजेंद्र पंडित असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर एसटी आगारात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र भागचंद पंडित (वय ४५, रा. पेंडापूर, ता. गंगापूर) आणि त्यांचे सहकारी विक्रम जाधव (रा. क्रांतीनगर, छत्रपती संभाजीनगर) हे दोघे ड्युटी संपवून दुचाकी (क्रमांक एमएच २० एच के ४६५०) वरून घरी जात होते. यावेळी गंगापूर-छत्रपती संभाजीनगर रोडवर हॉटेल विराज गार्डनजवळ समोरून येणाऱ्या ब्रीझा कार (क्रमांक एमएच २० जीव्ही ६८७०) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.
हेदेखील वाचा : Accident News: कार दोन ट्रकमध्ये अडकली अन्…; मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात
अपघाताची माहिती मिळताच मोरया रुग्णवाहिकेचे चालक सागर शेजवळ, सौरभ तिखे व ओंकार काळुंखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल केले. तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. महंमद साजिद शेख यांनी तपासणी करून राजेंद्र पंडित यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी विक्रम जाधव यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
डहाणूमध्ये भीषण अपघात
डहाणूमध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. डहाणू येथील महालक्षी येथे तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकच्या मध्यभागी एक कार येऊन तिहेरी अपघात घडला आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे.