
पीकअप-ट्रॅव्हल अपघात; चौघे ठार
मालेगाव : मनमाड-मालेगाव रस्त्यावर तालुक्यातील वऱ्हाणे शिवारात सोमवारी (दि.१९) पहाटे पिकअप व खासगी टेम्पो ट्रॅव्हलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. त्यात मालेगावच्या तिघा बारदान व्यावसायिकांचा व सेंधवा (मध्यप्रदेश) येथील एकाचा अशा चौघांचा मृत्यू झाला. तर उज्जैन येथे दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हलमधील 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की पीकअपचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
सत्तार खान मोहंमद खान (वय ३९), याकूब शेरू खान (वय २७), शेख अताऊर रहेमान आबीद (वय ३९, तिघे रा. अमनपुरा, मालेगाव) व सतिष मन्साराम गोहे (वय ३०, रा. सेंधवा, मध्यप्रदेश) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. सोमवारी पहाटे पीकअप क्रमांक (एमएच १२ जीएफ ७४२२) ही मनमाडकडे जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स (क्रमांक एमपी ७० झेडपी ७७९९) यांच्यात समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की पिकअपचा चक्काचूर झाला आहे.
अपघातग्रस्त पीकअपचे दरवाजे तोडून काढले बाहेर
तिघांना बाहेर काढण्यासाठी पीकअपचे दरवाजे तोडावे लागले. मालेगावातील तिघेजण पुणे येथे बारदान विक्रीसाठी जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातात ट्रॅव्हल्सचा क्लिनर गो-हे याचा देखील मृत्यू झाला दाखल करण्यात आला आहे. आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे.
नागरिकांत हळहळ
मालेगाव शहरातील अमनपुरा भागातील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बारदान विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. पिकअपच्या पुढच्या सीटवर तिघे जण बसले होते. या अपघाताची माहिती तालुका पोलिस, सामाजिक कार्यकर्ते आरीफ खान, खालीद शेख व-हाणे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
कर्त्या तरुणांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा
मनमाड रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घरातील कर्ते तरुण गेल्याने कुटुंब अडचणीत सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनमाड-मालेगाव रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन व तालुका पोलिसांकडून उपाययोजना केली जात नाही. तसेच वाहतूक कोंडीची समस्यादेखील या रस्त्यावर उद्भवत असते.
पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळाअभावी अनेक समस्या
पोलिसांच्या अपुऱ्या संख्येबळामुळे या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसतो. तसेच मनमाड व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादावरून वाहतुकीचा खेळखंडोबा नेहमीच होत असतो. वहाणे परिसरात अपघात प्रवण क्षेत्र आहे. या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेदेखील वाचा : थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO