पत्नी माहेरी जाताना दाम्पत्यामध्ये वाद; नंतर मृतदेहच आढळल्याने नातेवाईकांना धक्का
कोरची : पतीसोबतच्या रोजच्या भांडणांना कंटाळून माहेरी निघून गेलेल्या एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार हत्येच्या संदर्भात असल्याने मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून महिलेच्या पतीस संशियत आरोपी म्हणून कोटगूल पोलिसांनी अटक केली आहे.
पुरुषोत्तम गजराज कचलम (वय ३७, रा. सोनपूर) असे अटकेतील संशयित आरोपी पतीचे नाव असून, तामिनाबाई पुरुषोत्तम काचलम (वय ३४) असे हत्या झालेल्या त्याच्या पत्नीचे नाव आहे. तहसीलच्या कोटगुल पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत, मृत महिलेची आई चामरीबाई बोगा यांनी तिच्या मुलीचे लग्न सोनपूर येथील पुरुषोत्तम कचलम यांच्याशी समाजातील रीतिरिवाजांनुसार ठरवले होते. आणि या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. दारूचे व्यसन असलेला पुरुषोत्तम हा तामिनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.
यातच पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होते. या भांडणामुळेच सोमवारी (दि. १) तामिनाबाई पतीसोबत माहेरी निघाली होती. जंगल मार्गे येत असताना पुन्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. याच रागाच्या भरात पुरुषोत्तमने मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय मृत महिलेच्या आईने केला आहे.
दरम्यान, घटनेच्या तीन दिवसांनंतर कोमेली वनक्षेत्रात तामिनबाईचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. पुरुषोत्तम यानेच मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात टाकून दिल्याचा आरोप मृत महिलेच्या आईने केला असून, कोटगूल पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी संशयित म्हणून पुरुषोत्तम यास शुक्रवारी (दि. ५) अटक केली.
जालन्यात पतीने केली पत्नीची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, जालनाच्या भोकरदन तालुक्यातील पारध गावातून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आहे. त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव समाधान आल्हाट आणि त्यांची पत्नी कीर्ती अल्हाट असे आहे. दुपारी यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर समाधान अल्हाट याने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर समाधान अल्हाट याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.