भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्...
नागपूर : मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. आरोपींनी मित्राला सोडून त्याच्यावरच हल्ला केला. चाकूने छातीवर वार करून गंभीर जखमी केले. ठार मारण्याचा प्रयत्नात असतानाच पोलिस तेथे पोहोचल्याने आरोपी पळून गेले आणि तरुणाचा जीव वाचला. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्यांतर्गत चार दिवसांपूर्वी घडली.
पोलिसांनी जखमी सागर रमेश चौधरी (वय २५, रा. शिवशंभूनगर, कळमना) याच्या तक्रारीवरून आरोपी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. प्रतिक राजेंद्र सेलोकर (वय २१) आणि अमन जगदीश मानकर (वय २१) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अंश भानुसे (वय २३) आणि ओम मेश्राम (वय २३) हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटकेतील आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास सागर हा त्याच्या मित्रासोबत चहा पिण्यासाठी भरतवाडा चौकात गेला होता. या दरम्यान त्याला त्याचा एक परिचित मित्र जित याचे त्याच्या मित्रांसोबत भांडण होत असल्याचे दिसले.
सागरने मध्यस्थी करत दोन्ही पक्षांमध्येही समेट घडवून आणला. त्यानंतर दोघेही आपआपल्या मार्गाने निघून गेले. चहा पिऊन झाल्यावर सागर नवकन्यानगरात जेवण करण्यासाठी गेला. रात्री १.३० वाजताच्या सुमारास तेथून घरी जात असताना भरतवाडा मार्गावरील जामनगर परिसरात पुन्हा जित व त्याच्या मित्रामध्ये भांडण होताना दिसले.
भांडणातील मध्यस्थी भोवली
सागरने पुन्हा मध्यस्थी करत त्यांच्यातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे चिडून प्रतिकने त्याच्यावर चाकूने वार केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान पोलिसांनी चारही आरोपींवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.