
कुरकुंभ एमआयडीसीत केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 8 जणांना ठोेकल्या बेड्या
अल्ताफ चांद शेख (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे), सोनू मोईन अहमद, शाह आलम रोशन अली, दीपक कुमार शिवचरण, अर्जुन कुमार निगम, नूर मोहम्मद खलील, अतिक रहिमान हजरत अली खान व हनुमंत अंगद लिमकर (सर्व रा. गुणवरे वस्ती स्वामी चिंचोली ता. दौंड. मूळ रा. चंपापुर जि. सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी लहान-मोठ्या चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. बुधवारी (दि. ७) पांढरेवाडी गावाच्या हद्दीतील इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून २ लाख २१ हजार ८५० रुपये किमतीचे ५० मीटर लांबीची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुद्देमाल हस्तगत
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कुरकुंभ पोलिस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे व त्यांच्या पथकाने या टोळीचा छडा लावून आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली कॉपर केबल तसेच इन्वोव्हा कार (क्रमांक एमएच १३ एसी ०७८६) असा एकूण १२ लाख २१ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमारे, पोलीस हवालदार किरण पांढरे, निखिल जाधव, अमीर शेख, नितीन बोराडे, सुभाष राऊत व पोलीस शिपाई संजय कोठावळे यांच्या पथकाने केली. दरम्यान, टोळीचा सूत्रधार अल्ताफ चांद शेख याच्यावर यापूर्वी दौंड, भिगवण, बारामती व इंदापूर पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या टोळीने आणखी गंभीर गुन्हे केले आहेत का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.