धक्कादायक ! कोयत्याने सपासप वार करून पत्नीची हत्या; नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच वाशिम जिल्ह्यातील कोठारी गावात हत्येप्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मानसिक अस्वस्थतेने त्रस्त पतीने दवाखान्यात का नेता? या कारणावरून वेडसरपणात पत्नीवर कोयत्याने वार करून खून केला. त्यांनतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
हिंमत महादेव धोंगडे (वय ४१) व पत्नी कल्पना हिंमत धोंगडे (वय ३४, दोन्ही रा. कोठारी) अशी मृतांची नावे आहेत. पती-पत्नीच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कैलास महादेव धोंगडे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ हिंमत हा पत्नी कल्पना, दोन मुली व एका मुलासह शेजारी स्वतंत्र राहत होते. हिंमतला दारूचे व्यसन होते. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून तो मानसिकरित्या अस्वस्थ असल्याने वाशिम येथील एका मानसिक डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अशातच त्याने घरच्यांना वैताग आणला होता. त्यामुळे त्याला सोमवारी दवाखान्यात नेण्याचे ठरले. त्यासाठी दुपारी बारा वाजता रिक्षा घरासमोर आणली होती. घरासमोर वाहन पाहताच त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला.
काही वेळाने घरातून कल्पनाचा जोराने ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यानंतर हिंमतनेही गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा
याबाबत गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. मंगरूळपीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, कल्पना मृतावस्थेत आढळून आली तर हिंमत गळफास घेतलेल्या अवस्थेत होता.
जालन्याच्या घटनेची पुनरावृत्ती
काही दिवसांपूर्वीच, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध गावातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आहे. त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केले असल्याचे समोर आले आहे. पती-पत्नीमध्ये दुपारी वाद झाला होता. या वादानंतर समाधान अल्हाट याने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर समाधान अल्हाट याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.