चालकाची चाकूने भोसकून हत्या
नागपूर : क्षुल्लक कारणावरून दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान एकाने दुसऱ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना कळमना मार्केट यार्डच्या धान्य बाजार परिसरात घडली. रवी पुनाराम वाघमारे (वय 31, रा. चिखली, कळमना) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे.
किशोर ज्ञानेश्वर ठाकरे (वय 38, रा. वकीलपेठ, इमामवाडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. किशोर आणि रवी हे दोघेही कळमना बाजार परिसरात ट्रान्सपोर्टरचे वाहन चालवतात. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किशोर धान्य बाजारच्या खल्ला क्र. 12 जवळ हमाल आणि इतर चालकांसोबत बसलेला होता. या दरम्यान रवी हा सुद्धा तेथे आला. किशोरशी आधीपासूनच त्याचे पटत नव्हते. त्यामुळे तो किशोरला पाहताच चिडला आणि तेथे बसण्यास मनाई केली.
किशोरनेही जशास तसे उत्तर दिले. दोघेही दारूच्या नशेत असल्याने हा वाद चिघळला. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याच दरम्यान रवीने छोटा चाकू काढून किशोरवर हल्ला केला. किशोरने त्याचा वार रोखत चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर त्याच्यावर त्याच्याच चाकूने वार केला. रवीने तात्काळ मोठा भाऊ देवराव याला फोन करून किशोरने चाकू हल्ला केल्याची माहिती दिली.
आरोपी रवीने चाकूने केले सपासप वार
देवराव त्याच्या मित्रासोबत तेथे पोहोचण्यापूर्वीच किशोरने सपासप वार करून रवीला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि फरार झाला. देवराव घटनास्थळी पोहोचला असता रवीचा मित्र नासिर शेख याने किशोरने मारल्याची माहिती दिली. तोपर्यंत घटनेची माहिती मिळाल्याने कळमना पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते.
उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी केलं मृत घोषित
रवीला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी देवरावच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवत किशोरला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.