माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन
माढा : गेल्या काही महिन्याखाली वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतानाच माढ्यातील एका विवाहितेने टोकाचे पाऊल उचललं आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यानी तगादा लावल्यामुळे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दहीवली (ता. माढा) येथील पतीसह सासरे-सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. मयत विवाहितेचे नाव काजल नारायण मिस्किन (वय २५) असे आहे. तिचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. गेल्या चार वर्षांपासून पती नारायण विलास मिस्किन, सासरे विलास रामचंद्र मिस्किन व सासू शोभा विलास मिस्किन (रा. दहीवली, ता. माढा) हे तिला ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ करीत होते.
शेतातील काम नीट करत नाही, पैसे आणत नाही, असे कारण काढून तिच्यावर अत्याचार करत होते. या असह्य छळामुळे काजल हिने गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण दिगंबर वागज (भाऊ) यांच्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पती, सासरे व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
धनकवडीत महिलेची आत्महत्या
नणंदेसह तिच्या मुलगा, मुलगी व सुनेकडून सतत कौटुंबिक कारणावरून होणाऱ्या छळाला कंटाळून गेल्या काही दिवसाखाली महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नणंदेसह चौघांवर गुन्हा नोंदवला आहे. वर्षा तुकाराम रणदिवे (वय ३५, रा. व्यंकटेश अपार्टमेंटसमोर, गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उज्ज्वला बागाव (वय ५०), योगेश बागाव (वय ३५), वैशाली बागाव (वय ३२), सुवर्णा बागाव (वय २५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुकाराम रणदिवे (वय ४३, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे.